६ मेट्रो रेल्वे स्थानकांची कामे दिवाळी पर्यंत पूर्ण करण्याचा ‘महामेट्रो’चा संकल्प 

खारघर ः नवी मुंबई मेट्रो रेल्वे मार्गातील बेलापूर ते खारघर गाव दरम्यानच्या मेट्रो रेल्वे स्थानकांचे रखडलेले काम ‘महामेट्रो’ने हाती घेतले असून, येत्या जून महिना अखेरपर्यंत  मेट्रो रेल्वे स्थानकांची बाहेरील सर्व कामे पूर्ण करुन येत्या पावसाळ्यात मेट्रो रेल्वे स्थानकातील अंतर्गत कामे करुन येत्या दिवाळी पर्यंत  मेट्रो रेल्वे स्थानकांची सर्व कामे करण्याचा संकल्प ‘महामेट्रो’ने केला आहे. 

‘सिडको’च्या नवी मुंबई मेट्रो रेल्वे मार्गातील बेलापूर ते पेंधर या ११ किलोमीटर अंतरामध्ये ११ मेट्रो रेल्वे स्थानक असून, त्यातील पेंधर ते सेंट्रल पार्क दरम्यानच्या पाच मेट्रो रेल्वे स्थानकांचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, बेलापूर, आरबीआय कॉलनी, बेलपाडा (भारती विद्यापीठ), उत्सव चौक, केंद्रीय विहार आणि खारघर गाव या ६ मेट्रो रेल्वे स्थानकांचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. 


दरम्यान, येत्या मार्च महिन्यात पेंधर ते सेंट्रल पार्क दरम्यान मेट्रो रेल्वे सुरु होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवाळी  पर्यंत उर्वरित मेट्रो रेल्वे स्थानकांचे काम पूर्ण करुन येत्या डिसेंबर पूर्वी नवी मुंबई मेट्रो रेल्वे बेलापूर ते पेंधर मार्गावर धावेल, या गतीने ‘महामेट्रो’कडून काम सुरु आहे. सदर काम जे. कुमार या एजन्सीला देण्यात आले आहे. 


सिडको प्रशासनाने ‘महामेट्रो’वर विश्वास ठेवून नवी मुंबई मेट्रो रेल्वे स्थानक उभारणीचे काम दिले आहे. त्यामुळे वेळेत काम पूर्ण करण्याचा संकल्प ‘महामेट्रो’ने केला आहे. मागील वर्षी ‘कोरोना’च्या भीतीमुळे कामगार कमी प्रमाणात होते. तसेच पावसाळ्यात कोसळणाऱ्या पावसामुळे मेट्रो रेल्वे स्थानकांची बाहेरील कामे करता आली नाहीत. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी म्हणजे जून अखेर पर्यंत रखडलेल्या सहा मेट्रो रेल्वे स्थानकांचे बाहेरील सर्व काम पूर्ण करुन स्थानकातील अंतर्गत काम दिवाळी  पर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प ‘महामेट्रो’ने केला आहे. येत्या डिसेंबर पूर्वी बेलापूर ते पेंधर मार्गावर मेट्रो रेल्वे सुरु व्हावी, या दिशेने कामाचे नियोजन ‘महामेट्रो’ने केले असून, उर्वरित ६ मेट्रो रेल्वे स्थानकांचे काम वेगाने सुरु आहे, असे महामेट्रो अधिकाऱ्यांनी सांगितले.  

पावसाळ्यात दिवसभर उघडझाप, सतत कोसळणाऱ्या संततधार पावसाचा अंदाज येत नाही. जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. त्यामुळे सेंट्रल पार्क ते पेंधर मार्ग दरम्यान पेठपाडा, अमनदूत आणि पेंधर या तीन मेट्रो रेल्वे स्थानकाचे बाहेरील काम पावसाळ्यात करता आले नाही. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी मेट्रो रेल्वे स्थानकांची बाहेरील संपूर्ण कामे पूर्ण केली जाणार आहेत, अशी माहिती महामेट्रो अधिकाऱ्यांनी दिली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

शहरातील कारंजे पाण्यासाठी आसुसलेत ?