क्रिकेट खेळताना हृदयविकाराने मृत्यू होण्याच्या घटनेत वाढ

नवी मुंबई-: कोरोनामुळे मागील दिड वर्षांपासून खेळाचे प्रकार बंद होते .मात्र आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने तरूणाई पुन्हा एकदा खेळाकडे वळली आहे.  क्रिकेट खेळ हा सर्वत्र खेळला जात आहे. मात्र आरोग्य क्षेत्रातील एका आकडेवारीनुसार २०२०- २१ मध्ये महाराष्ट्रामध्ये ३० ते ४० तरुणांचा क्रिकेट मैदानावर मृत्यू झाला आहे, त्यामुळे तरुणांनी क्रिकेट खेळताना सावधानता बाळगणे जरुरी आहे. असे मत वैद्यकीय तज्ञांकडुन व्यक्त केले जात  आहे.

मुंबईसह नवी मुंबई, रायगड ठाणे पालघर या लगतच्या शहरांमध्ये मैदानी  खेळामध्ये सर्वाधिक क्रिकेट खेळ  तरुणांकडुन खेळला जात आहे. आणि या क्रिकेटस्पर्धांमध्ये १८ वर्षांपासून ते पन्नाशी पार केलेल्या नागरिकांचा यात थेट सहभाग असतो . खेळत असताना शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे चक्कर येणे , पडल्यामुळे दुखापत होणे तसेच उच्च रक्तदाब वाढल्यामुळे भोवळ येणे असे प्रकार मैदानात होत असतात, अशावेळी तात्काळ उपचार करणे फार गरजेचे असते. अनेकवेळा चक्कर आल्यावर त्या खेळाडूला सावलीत बसविले जाते अथवा तंबूमध्ये आराम करण्यास सांगितले जाते परंतु असे करणे चुकीचे आहे.  तिशीच्या तरुणांमध्ये हृद्यविकार वाढत असून त्यामागची कारणे ही आजच्या विसंगत जीवनशैलीमध्ये सापडतात. मुख्यत्वे खाण्याच्या व झोपण्याच्या वेळेत झालेला कमालीचा बदल शारीरिक व मानसिक ताणतणाव वाढण्यास कारणीभूत ठरतो. बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेह व उच्च रक्तदाब चोर पावलांनी शरीरात शिरल्यावर हृदयविकार होण्याचा धोका अधिक वाढतो. जेंव्हा मैदानात खेळ सुरु असताना तेथील स्पर्धेच्या वातावरणामुळे शरीरातील रक्तदाब हा वाढलेला असतो अशा वेळी ज्या व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा त्रास असतो त्या खेळाडूचे  हृदयाचे ठोके अव्यवस्थित होतात, कमी वा जास्त होतात अशावेळी डॉक्टरांचे मार्गदर्शन घेणे फार गरजेचे असते." 

दिवसभर काम करून थकलेल्या शरीराला विश्रांतीची नितांत गरज असते हीच विश्रांती झोपेच्या माध्यमातून मिळत असते. म्हणजेच शरीर आरोग्यदायी ठेवण्यात झोपेची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत असते; पण काही लोक रोज प्रमाणापेक्षा जास्त, तर काही जण कमी झोप घेत असतात याचा परिणाम मात्र त्यांच्या आरोग्यावर होत असतो.रोज सात तासांपेक्षा कमी अथवा जास्त झोपेचा  थेट संबंध हृदयाच्या तारुण्याशी येतो. जी तरुण मंडळी रोज सात तासांपेक्षा कमी झोप घेते  त्यांचे हृदय वृद्धत्वाकडे जात असल्याचे  अमेरिकेतील जॉर्जियामधील 'इमोरी युनिव्हर्सिटी'तील संशोधनात दिसून आले आहे. तर सततचा मानसिक ताणतणाव, बिघडलेली आर्थिक गणिते, नात्यांमधील दुरावा व सोशल मीडियाच्या आहारी गेलेली तरुण पिढी पाहता भविष्यात हृद्यविकार वाढण्याची शक्यता असून रोजच्या जीवनशैलीमध्ये तत्काळ बदल करणे गरजेचे आहे असे मत क्रिटीकेयर लाइफलाईन हॉस्पिटलचे हृदयविकार तज्ञ डॉ. अविनाश गुठे  यांनी व्यक्त केले.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

६ मेट्रो रेल्वे स्थानकांची कामे दिवाळी पर्यंत पूर्ण करण्याचा ‘महामेट्रो’चा संकल्प