थकबाकीदारांना बँकेने पूर्व सूचना, नोटीस देण्याची मागणी
वाशी ः थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करताना बँकांकडून जप्तीताबा प्रकिया राबवत असताना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश घेणे बंधनकारक आहे. मात्र, थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करताना थकबाकीदारांना पूर्व सूचना अथवा नोटीस देण्यात यावी, अशी मागणी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना’चे उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी ठाणे जिल्ह्याधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
थकबाकीदारांच्या मालमत्ता बँकांना जप्त करुन ताबा देण्याकरिता आदेश पारित करत असताना जिल्ह्याधिकारी वसुलीदार (प्रतिवादी) यांना पूर्व सूचना अथवा नोटीस न देताच आदेश पारित होतात. यामुळे बँकेचे अधिकारी अपवाद चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचे प्रकार निदर्शनास येत असल्यामुळे तसेच सदर प्रकारामुळे कसुरदार अन्य व्यक्तीचे नुकसान होत असून, चुकीच्या पध्दतीने जप्तीची कारवाई होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यापुढे होणाऱ्या आदेशाकरिता कसुरदार अथवा सदर मालमत्तेचा ताबा कोणाकडे आहे याबाबत खात्री करण्याकरिता जिल्हाधिकारी यांची नोटीस अथवा समन्स देणे आवश्यक आहे. त्यामुळे बँकांकडून काही अंशी चुकीची कागदपत्र सादर करुन ताबा मिळवून देण्याबाबत गैरकाम करुन संबंधित व्यक्तीवर अन्याय होणार नाही आणि सदर कामकाजात पारदर्शकता येईल, असे ‘महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना’चे उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी ठाणे जिल्ह्याधिकारी राजेश नार्वेकर यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. ठाणे जिल्ह्याधिकारी राजेश नार्वेकर यांना निवेदन देताना बाळासाहेब शिंदे यांच्या सोबत विनायक जाधव, संकेत निवडुंगे, आशिष मोरे आदी उपस्थित होते.