सफाईमित्रांसाठी दोन दिवसांची विशेष कार्यशाळा
नवी मुंबई : 'सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज अभियान 2021' मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेस देशात व्दितीय क्रमांकाचे मानांकन प्राप्त झाले आहे. यामध्ये सर्व सफाईमित्रांचे बहुमोल योगदान असून महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी महापालिकेच्या या राष्ट्रीय सन्मानाचे खरे मानकरी सफाईमित्र व नवी मुंबईकर नागरिक असल्याचे सांगत हा सन्मान त्यांना समर्पित केला आहे.
यावर्षीच्या 'स्वच्छ सर्वेक्षण 2022' ला प्रारंभ झाला असून यावर्षी 'सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज' हे स्वतंत्र अभियान म्हणून राबविले न जाता ते स्वच्छ सर्वेक्षणाचाच एक भाग असणार आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार सुरक्षा साधने व सामुग्रीचा वापर करून सक्शन, जेटींग मशीन तसेच यांत्रिक पध्दतीने मलनि:स्सारण विषयक कामे करण्याबाबतच्या दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात 'सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज कार्यशाळे'चा प्रारंभ घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तथा स्वच्छ भारत अभियानाचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे, अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील, कार्यकारी अभियंता अजय संख्ये, मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी उप अभियंता वसंत पडघन, संतोष उनवणे, शंकर जाधव, कैलाश गायकवाड, दिपक सुरवसे, जितेंद्र रावळ, अरविंद शिपुरकर, अर्जुन बिराजदार आणि स्वप्निल देसाई, वैभव देशमुख, बळीराम जाधव, विकास वखारे, कौस्तुभ पाटील, दिलीप बेनके आदी अभियंते आणि मोठया संख्येने सफाईमित्र उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी आपल्या सफाईमित्रांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळेच राष्ट्रीय पातळीवर व्दितीय मानांकन प्राप्त झाले असल्याबद्दल अभिनंदन करीत यावर्षी हे चॅलेंज स्वच्छ सर्वेक्षणाचा एक भाग झाल्यामुळे आपली जबाबदारी वाढली असल्याचे स्पष्ट केले. त्या अनुषंगाने बदलत्या तंत्रज्ञानाला अंगिकारत आयुक्त महोदयांच्या मार्गदर्शनाखाली अद्ययावत यंत्रसामुग्री उपलब्ध करून घेण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. कॅम फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये देण्यात येणारी माहिती लक्ष देऊन आत्मसात करावी व त्याचा आपल्या दैनंदिन कामात उपयोग करावा असे सफाईमित्रांना सांगितले. सर्व सफाईमित्रांना प्रशिक्षणाअंती प्रशस्तीपत्रांचे वितरणही केले जाणार आहे.