जेएनपीटी एसईझेड परिसरात पाणथळीवर भराव

नवी मुंबई ः हरितप्रेमी गटांच्या तक्रारीवर झटपट हालचाल करत केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान नियंत्रण मंत्रालयाने ‘महाराष्ट्र पाणथळ प्राधिकरण’ला जेएनपीटी एसईझेड कडून पर्यावरण मंजुरी प्रकरणात झालेल्या उल्लंघनाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, याप्रकरणी जबाबदारीने आपली भूमिका बजावत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा पाटणकर-म्हैसकर यांना सदर तक्रारीची दखल घण्याची सूचना केली. जेएनपीटी एसईझेड प्रकल्पात पर्यावरण मंजुरी (ईसी) प्राप्त झाली. मात्र, त्यात पाणथळ क्षेत्रावरील भरावाचा उल्लेख नव्हता. तरीही सध्या २२ हेक्टर सावरखार पाणथळ क्षेत्रावर झपाट्याने मोठ्या प्रमाणावर भराव टाकण्याचे काम सुरु आहे. नाटकनेक्ट फाऊंडेशन आणि श्री एकवीरा आई प्रतिष्ठान या हरितप्रेमी संस्थांनी केंद्र तसेच राज्याला ई-मेलद्वारे केलेल्या तक्रारीत सदर मुद्याचा उल्लेख करण्यात आला. सावरखार पाणथळीचा समावेश उरण तहसीलदारांनी स्वतः सूचीबध्द केलेल्या १३ घटकांत आढळतो. मात्र, अधिकाऱ्यांना याचे संरक्षण व्हावे असे वाटत नसल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.

इन्वायर्नमेंट, फॉरेस्ट ॲन्ड क्लायमेट चेंज मंत्रालयातील वैज्ञानिक डॉ. एम रमेश यांनी पर्यावरणप्रेमींच्या तक्रारीला प्रतिसाद देताना राज्य शासन आणि पाणथळ प्राधिकरणाकडे तक्रारींवर केलेल्या कारवाईच्या अहवालाची मागणी केली आहे. मागील महिन्याच्या पूर्वार्धात पर्यावरणप्रेमींनी अनधिकृत पध्दतीने पाणथळीवरील भरावाची तक्रार केल्यानंतर महसूल अधिकाऱ्यांनी अनोळखी व्यक्तींविरुध्द एफआयआर दाखल केली होती. त्यानंतर काम थांबवण्यात आले. मात्र, सूड उगविल्याप्रमाणे पुन्हा काम सुरू करण्यात आल्याचे पर्यावरण गटाने सांगितले.

यादीतील पाणथळ क्षेत्रावरील भराव स्तंभात सुधारित पर्यावरण मंजुरीबद्दल नाही असे नमूद करत नकार दर्शवलेला आहे. पाणथळ (संवर्धन-व्यवस्थापन) अधिनियम २०१७ मधील ताज्या मार्गदर्शक तत्त्वांतंर्गत अगदी भात शेती, मिठागरे आणि मासेमारी करिता असलेले तलाव आदि संवर्धित करण्याचा मुद्दा लक्षात घणे योग्य ठरेल, असे शासनाचे लक्ष पर्यावरण मंजुरीच्या मुद्याबाबत ‘नाटकनेक्ट फाऊंडेशन’चे संचालक बी. एन. कुमार यांनी सूचित केले.

जसखार, कराळ, सोनारी आणि सावरखार या सर्व चार ग्रामपंचायती, जेएनपीटी एसईझेडच्या अखत्यारितील २७७.३८ हेक्टर पाणथळ क्षेत्रात आहेत. आपल्याला तातडीने वरिष्ठ महसूल अधिकारी उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी उरण तहसीलदारांकडे केली होती. एसईझेड प्रकल्पासाठी जेएनपीटीकडून अविवेकी पध्दतीने भराव टाकण्यात आल्याने गावात पूर येत असल्याची तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात आल्याचे ‘श्री एकवीरा आई प्रतिष्ठान’चे प्रमुख नंदकुमार पवार यांनी सांगितले. पाणथळ क्षेत्रात भरावाचे काम राजरोस सुरू असून याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे पवार म्हणाले.

कांदळवनांचे क्षेत्र असूनही पर्यावरण मंजुरी मिळालेली नाही. जेएनपीटी एसईझेड भरावामुळे सागरी वनस्पतींची मोठी कत्तल सुरु आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे किंवा संवेदनशील भूभाग-पाणथळी, जलस्त्रोत किंवा अन्य जल पर्याय, सागरी क्षेत्र, जीवमंडळे, डाेंगर, जंगल या स्तंभाखाली फक्त १४ कि.मी. दूर असलेल्या कर्नाळा पक्षी अभयारण्याची नाेंद आढळते. जेएनपीटी एसईझेड प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर कांदळवनांची कत्तल आम्ही पाहिलेलीअसून कांदळवन क्षेत्रात टाकण्यात आलेल्या भरवाची पुरावा म्हणून छायाचित्र देखील तक्रारीत जोडण्यात आली आहेत, असे बी. एन. कुमार यांनी सांगितले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जैवविविधता केंद्रात लवकरच खारफुटी सेंटर, म्युझियम