मालमत्ता कराच्या नोटीसांची होळी करणा-या आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल

नवी मुंबई : करोनाच्या पार्श्वभुमीवर मोर्चे, निदर्शने, धरणे, बंद पुकारणे या प्रकारचे आंदोलन करण्यास मनाई करण्यात आलेली असताना देखील नवी मुंबई ९५ गाव, नैना व इतर प्रकल्पग्रस्त समितीच्या पदाधिका-यांनी पनवेल महापालिकेने मालमत्ता कराच्या अवास्तव व अन्यायकारक नोटीसा नागरीकांना दिल्याच्या निषेधार्थ महापालिका नोटीसांची होळी करुन आंदोलन केले. त्यामुळे खारघर पोलिसांनी अॅड. सुरेश ठाकुर यांच्यासह नगरसेवक व इतर प्रमुख पदाधिका-यांसह २० ते २५ कार्यकर्त्यांवर मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  

करोना व ओमायक्रॉनच्या पार्श्वभुमीवर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्धीत राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व कामगार संघटनांना मोर्चे, निदर्शने, धरणे, बंद पुकारण्यास तसेच उपोषणासारखे आंदोलन करण्यास मनाई करण्यात आली आहे. असे असतानाही नवी मुंबई ९५ गाव, नैना व इतर प्रकल्पग्रस्त समितीच्या वतीने अॅड. सुरेश ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिकेने मालमत्ता कराच्या अवास्तव व अन्यायकारक नोटीसा नागरीकांना दिल्याने त्याच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी निषेध आंदोलन केले. यावेळी समितीच्या पदाधिका-यांनी खारघर येथील महापालिका अ प्रभाग समिती कार्यालयासमोर महापालिकेने नागरीकांना बजावलेल्या नोटीसांची होळी करुन महापालिकेच्या विरोधात घोषणा दिल्या.  

या कार्यकर्त्यांनी विनापरवानगी एकत्र येऊन सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता, तसेच नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षितता धोक्यात आणुन करोना विषाणुंचा प्रसार रोखण्यासाठी शासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनेचे पालन केले नाही. तसेच त्यांनी पोलिसांनी लागू केलेल्या मनाई आदेशाचा भंग केला. त्यामुळे खारघर पोलिसांनी समितीचे पदाधिकारीअॅड. सुरेश ठाकुर, नावडे येथील नगरसेवक अरविंद म्हात्रे, कळंबोलीतील नगरसेवक रविंद्र भगत, गोपाळ भगत, केसरीनाथ पाटील, फारुक पटेल, गुरुनाथ खडतर,जगदीश ठाकुर, इस्माईल पटेल, अॅड. विजय घाडगे, संतोष गायकर व इतर १५ ते २० कार्यकर्त्या विरोधात मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.   

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

शहरातील बेवारस २१२३ वाहनांची माहिती महापालिका वेबसाईटवर प्रसिध्द