शहरातील बेवारस २१२३ वाहनांची माहिती महापालिका वेबसाईटवर प्रसिध्द
नवी मुंबई ः महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील कलम २३० अन्वये महापालिका आयुक्त यांची लेखी परवानगी घतल्याशिवाय महापालिका क्षेत्रातील रस्त्यावर अथवा पदपथावर कोणतीही वस्तू ठेवण्यास मनाई आहे. परंतु, शहरातील सर्वच नोडमध्ये मुख्य रहदारीचे रस्ते आणि अंतर्गत रस्ते यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात बंद वाहने असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच बंद अवस्थेतील वाहनाखाली मोठ्या प्रमाणात कचरा साठून राहिल्यामुळे त्या ठिकाणी नियमित स्वच्छता करता येत नाही. परिणामी, शहर स्वच्छतेत अडथळा निर्माण होतो.
‘स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये ‘निश्चय केला-नंबर पहिला’ असे ध्येय नजरेसमोर ठेवून सामोरे जात असताना अशाप्रकारच्या रस्त्यावर उभ्या असलेल्या बेवारस वाहनांमुळे शहर स्वच्छतेला खीळ बसत आहे. याबाबत महापालिकेमार्फत अशी वाहने हलविणेबाबत वारंवार आवाहन करण्यात येत असून अशा वाहनांवर रितसर नोटीसाही संबंधित विभाग कार्यालयामार्फत लावण्यात आल्या आहेत. तरीही अनेक वाहन मालकांकडून प्रतिसाद मिळताना दिसत नाही.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील कलम २३१ अन्वये महापालिका आयुक्त यांना रस्त्यावर अथवा पदपथावर ठेवण्यात आलेल्या वस्तू नोटीस न देता काढून टाकण्याचा अधिकार प्राप्त आहे. या अनुषंगाने महापालिकेने नियमितपणे वाहने हटविण्याबाबत संबंधित वाहन मालकांना, संबंधित विभाग कार्यालयामार्फत नोटीसा बजाविलेल्या होत्या. तसेच महापालिकेकडून वृत्तपत्रातून जाहीर आवाहनही करण्यात आलेले होते. मात्र, संबंधित मालकांनी त्यांची बंद अवस्थेत असलेली वाहने अद्यापही हटविलेली नसल्याने शहरातील सर्वच नोडमध्ये बंद वाहने ठिकठिकाणी मुख्य रहदारीचे रस्ते आणि अंतर्गत रस्ते यावर मोठ्या प्रमाणात उभी असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे सन २०१६ पासून ते आजतागायत महापालिकेकडून बंद अवस्थेत उभी असलेली वाहने उचलण्याची कारवाई करण्यात आलेली आहे.
सन २०१६ मध्ये परिमंडळ-१ आणि २ अंतर्गत येणाऱ्या विभाग कार्यालयांकडून मुख्य रहदारीचे रस्ते आणि अंतर्गत रस्ते यावर बंद अवस्थेत उभी असलेली वाहने उचलण्याबाबतची कारवाई करण्यात आलेली आहे. उचलण्यात आलेली वाहने कोपरखैरणे येथील महापालिकेच्या डंपींग ग्राऊंडवर तसेच ऐरोली आणि महापे येथे जमा करण्यात आलेली आहेत. सदर जमा करण्यात आलेल्या २१२६ वाहनांची सूची नवी मुंबई महापालिकेच्या www.nmmc.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. नवी मुंबई महापालिकेने कारवाई करुन उचललेल्या वाहनांच्या मालकांनी महापालिकेच्या वेबसाईटवर आपल्या वाहनाविषयी माहिती घ्यावी. ज्या मालकांची सदर वाहने आहेत त्या वाहन मालकांनी १५ दिवसाच्या आत महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा. संबंधित वाहनाची मूळ कागदपत्र दाखवून विभाग कार्यालयात नियमानुसार शुल्काचा भरणा करावा आणि वाहन जमा असलेल्या ठिकाणाहून आपले वाहन स्वखर्चाने घऊन जावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहरे.
उर्वरित वाहनांबाबत यापुढील काळात महापालिका कोणत्याही प्रकारची जबाबदारी स्विकारणार नाही. याबाबत उप-प्रादेशिक वाहतूक अधिकारी (संबंधित) यांनी नाेंद घ्यावी. जे वाहन मालक १५ दिवसांच्या आत वाहन घऊन जाणार नाहीत, अशी वाहने नवी मुंबई महापालिकेकडून बेवारस वाहन म्हणून घोषित केली जातील. तद्नंतर घोषित केलेल्या, बेवारस ठरविलेल्या वाहनांची महापालिकेमार्फत निविदा काढून भंगारात विक्री करण्यात येईल, असा इशारा देण्यात येत आहे. -अभिजीत बांगर, आयुक्त-नवी मुंबई महापालिका.