अर्थसंकल्पात शिक्षण, आरोग्य विभागासाठी विशेष तरतूद करण्याची मागणी

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेच्या होऊ घातलेल्या सन २०२२-२३ अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने महापालिकेच्या सर्व शाळांचे आधुनिकीकरण करणे, खाजगी शाळांप्रमाणे शिक्षक-शिक्षणावर भर देणे, मध्यमवर्गीयांची मुले महापालिका शाळांकडे आकर्षित होण्यासाठी विशेष उपक्रम राबविणे, महापालिकेमार्फत ज्युनिअर कॉलेज सुरु करणे, आरोग्य केंद्रांचे आधुनिकीकरण, आदि मागण्या ‘भाजपा अनुसूचित जाती-जमाती सेल’चे जिल्हाध्यक्ष विकास सोरटे यांनी महापालिका आयुक्तांकडे केल्या आहेत.

यासंदर्भातील मागण्यांचे निवेदन विकास सोरटे यांनी ८ फेब्रुवारी रोजी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दिले आहे. येत्या काही दिवसात नवी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प जाहिर होणार आहे. त्याअनुषंगाने शिक्षण विभागाकडे जास्त लक्ष वेधण्याच्या अनुषंगाने विकास सोरटे यांनी अर्थसंकल्पामध्ये आर्थिक तरतूद करण्याची विनंती महापालिका आयुक्तांना केली आहे. यामध्ये नवी मुंबई महापालिकेच्या सर्व शाळांचे आधुनिकीकरण करावे, महापालिका शाळांमध्ये खाजगी शाळांसारखे उत्तम दर्जाचे शिक्षक आणि शिक्षण दिले जाईल यावर भर देण्यात यावा, महापालिका शाळांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात नवी मुंबईतील मध्यमवर्गीय विद्यार्थी आकर्षित होतील याकरिता कार्यक्रम राबविणे, महापालिकेच्या वतीने ज्युनियर कॉलेज सुरु करणे, महाविद्यालयाची उभारणी, महापालिकेतर्फे संगीत विद्यालयाची स्थापना करुन त्या विद्यालयाला भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे नाव द्यावे, महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रांचे आधुनिकीकरण करणे, नागरी आरोग्य केंद्रात रक्त तपासणी आणि एक्स-रे यांची सुविधा निर्माण करणे, महापालिका क्षेत्रातील प्रत्येक नोड मध्ये संविधान चौकाची उभारणी करणे, मुंबई महापालिकेप्रमाणे नवी मुंबई परिसरात हायवे सुविधा उपक्रम सुरु करणे, महापालिकेच्या अभ्यासिका आणि व्यायाम शाळांचे आधुनिकीकरण करणे, आदि मागण्यांचा समावेश आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

माथाडी कामगारांसाठी ‘सिडको’च्या घरकुल योजनेमध्ये घरे -आ.शशिकांत शिंदे