माथाडी कामगारांसाठी ‘सिडको’च्या घरकुल योजनेमध्ये घरे -आ.शशिकांत शिंदे

नवी मुंबई ः ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी’चे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री यांनी दिलेल्या सुचनेनुसार आमदार शशिकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सिडको भवन येथे माथाडी कामगारांना घरे उपलब्ध करुन देण्याबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये वाशी ट्रक
टर्मिनल, जुईनगर, कळंबोली, मानसरोवर, उलवा, तळोजा आणि ‘सिडको’च्या इतर घरकुल योजनेमध्ये माथाडी कामगारांना प्राधान्याने घरे उपलब्ध करुन देण्याचा प्राथमिक निर्णय घेण्यात आला आहे.

सदर बैठकीप्रसंगी ‘सिडको’चे सह-व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुद्‌गल, वरिष्ठ अधिकारी फैय्याज शेख, माथाडी संघटनाचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, माथाडी मंडळाचे ग्रोसरी बोर्डाचे चेअरमन वाघ, ट्रान्सपोर्ट बोर्डाचे चेअरमन खरात, रेल्वे बोर्डाचे चेअरमन दाभाडे, आयर्न बोर्डाचे चेअरमन व्हनगळकर,भाजीपाला
बोर्डाचे सेक्रेटरी खोत, आदि उपस्थित होते.

माथाडी कामगार प्रामुख्याने नवी मुंबई परिसरात त्याच्या कुंटुंबासमवेत रहात असल्याने त्यांना ‘सिडको’च्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या घरकुल योजनेतून घरांचा लाभ मिळावा, यासाठी संघटेनेचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी गेल्या ६ महिन्यापासून ‘सिडको’कडे सतत मागणी आणि पाठपुरावा केला होता. सदर मागणीच्या अनुषंगाने सिडको कार्यालयात अनेक वेळा बैठका घेण्यात आल्या होत्या. याच विषयावर ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीमध्ये निर्णय घतल्यानुसार नवी मुंबई परिसरात माथाडी कामगारांकरिता ‘सिडको’च्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या घरकुल योजनेतुन सुमारे ४० ते ४५ हजार घरे उपलब्ध होणार आहेत. तसेच माथाडी कामगारांच्या मागणीनुसार शासनाच्या माथाडी मंडळांमार्फत सदर घरांचे वाटप करण्याचा निर्णय घण्यात आलेला आहे.

माथाडी कामगारांनी बोर्डाच्या माध्यमातून घरांसाठी मागणी करण्याचा निर्णयही घेण्यात आलेला आहे. याबाबत असणारी संपूर्ण प्रक्रिया पुढील ८ ते १० दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर कामगारांना त्यांच्या मागणीनुसार टप्प्या-टप्प्याने शासनाच्या बोर्डाच्या माध्यमातूनच घरांचे वाटप करण्याचे ठरविण्यात आले आहे. सदर प्रक्रियेमध्ये जादा प्रमाणात अर्ज उपलब्ध झाल्यास या घरांचे वाटप लॉटरी पध्दतीने करण्यात येणार आहे.

एकंदरीतच सदर बैठकीमध्ये माथाडी कामगारांना घरांसाठी लागणारे कर्ज आणि इतर नियोजन याबाबतही निर्णय घण्यात आला आहे. सदरची संपूर्ण प्रक्रिया माथाडी कामगारांचे प्रणेते कै. अण्णासाहेब पाटील यांच्या येत्या २३ मार्च रोजी असणाऱ्या पुण्यतिथी दिनाअगोदर करण्याचा मानस आहे. - आमदार शशिकांत शिंदे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खारघरमध्ये मालमत्ता कराची होळी करून निषेध