पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान
नवी मुंबई : वृक्ष लागवड, पर्यावरण संवर्धन व ऊर्जा बचत क्षेत्रात गेली १५ वर्ष उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मेंगडेवाडी - निरगुडसरचे सुपुत्र तथा नवी मुंबई गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त सुरेश सावळेराम मेंगडे यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पर्यावरण संवर्धन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते. मानचिन्ह , प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. राष्ट्रीय नागरी पर्यावरण संरक्षण संस्थेच्या वतीने राजभवन येथे नुकताच पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला.
तुर्ची (ता. तासगाव जि.सांगली) या दुष्काळी परिसरातील पोलिस प्रशिक्षण केंद्रामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष होते. अशा ठिकाणी मेंगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दूरवरून पाणी आणण्याची व्यवस्था करून तेथील पडीक व खडकाळ जमिनीवर दोन हजार ५०० वृक्षांची लागवड केली. त्यामुळे या प्रशिक्षण केंद्रास २०१३ मध्ये ' वनश्री पुरस्कार ' देऊन सन्मानित करण्यात आले होते . पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे हे सध्या नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कार्यरत असून या ठिकाणी देखील त्यांनी कांदळवन -हास व अतिक्रमण थांबविण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहे. या कामाची दखल उच्च न्यायालयाने घेतली होती .