जेएनपीटी प्रशासन विरोधात जेएनपीटी स्थानिक प्रकल्पग्रस्त मजूर संस्था करणार तीव्र आंदोलन

जेएनपीटी : आशिया खंडातील सर्वात महत्वाचे बंदर म्हणून जे एन पी टी बंदर (पोर्ट )जगप्रसिद्ध आहे. या जे एन पी टी सेझ मधील साफसफाईचे 6.86 कोटीचे निघालेले काम मजूर संस्थांना विभागून द्या असे शिवसेनेचे नेते तथा मावळ मतदार संघाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादीच्या नेत्या तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदितीताई तटकरे यांनी जे एन पी टी प्रशासनाला पत्र दिले होते. मात्र जे एन पी टी सेझ मधील 6.86 कोटीचे साफसफाईचे काम जे एन पी टी स्थानिक प्रकल्पग्रस्त मजूर संस्थांना विभागून न देता खाजगी ठेकेदारांना देण्यात आलेले आहेत. त्यामुळे खासदार व पालकमंत्री यांच्या आदेशाला जे एन पी टी प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे.उरण तालुक्यातील स्थानिक नागरिक असलेल्या जे एन पी टी स्थानिक प्रकल्पग्रस्त मजूर संस्था फेडरेशन या कामगार संघटनेवर अन्याय झाल्याने व या मजूर संस्थेच्या मागण्या मान्य न झाल्याने सदर संस्थेने जे एन पी टी प्रशासना विरोधात निदर्शने व आंदोलनाचा इशारा दिला आहे.

जेएनपीटी (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट) या बंदराच्या प्रकल्पसाठी उरण तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या पिकत्या जमिनी कवडीमोल भावाने विकल्या. त्या बदल्यात जे एन पी टी प्रशासनाने शेतकऱ्यांना, प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. तसेच ज्यांना नोकऱ्या मिळणार नाहीत त्यांना जे एन पी टी तसेच जे एन पी टी सेझ मधील साफसफाईची कामे मजूर संस्थेच्या रूपात देण्यात येईल असे ठरले होते. त्यानुसार गावोगावी मजूर संस्था स्थापन झाल्या. या मजूर संस्थांना 25 वर्षापूर्वी 25 लाखाचे कामे मिळत होती.सध्या 2 वर्षापूर्वी 25 लाखाची किंमत वाढवून 2 कोटी पर्यंतची साफसफाईची कामे मजूर संस्थांना देण्याचे ठरले त्यानुसार सदरचे काम मजूर संस्थेला द्यायला पाहिजे होते मात्र तसे झाले नाही. सद्यस्थितीत जे एन पी टी प्रशासनाने सेझ मध्ये रस्ता साफसफाईचे व बागकामाचे 6.86 कोटीचे काम काढले आहे. मात्र हे काम मजूर संस्थेला न देता खाजगी ठेकेदाराला देण्यात आल्याने स्थानिक प्रकल्पग्रस्त मजूर संस्था संतप्त झाल्या आहेत.

सदर ठेकेदार साफसफाईच्या कामासाठी मशीनरी आणणार असल्याने 100 हुन जास्त प्रकल्पग्रस्तांचा  रोजगार मिशीनरिमुळे बुडणार आहे. मशीन लावून साफसफाई होणार असल्याने शेकडो स्थानिक कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यामुळे सदरचे काम जे एन पी टी स्थानिक प्रकल्पग्रस्त मजूर संस्था फेडरेशनला देण्यात यावे अन्यथा जेएनपीटी प्रशासना विरोधात तीव्र निदर्शने व आंदोलने करण्याचा इशारा सदर संघटनेचे अध्यक्ष जनार्दन भोईर, उपाध्यक्ष नरेंद्र ठाकूर, सचिव कुणाल घरत, सल्लागार -जे पी म्हात्रे यांनी दिला आहे

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कुचकामी धोरणामुळे बायपास रस्त्याचे घोंगडं पडलं भिजत