नवी मुंबई मध्ये ‘महालक्ष्मी'चा जागर

नवी मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राच्या अस्मितेचा सुगंध, कष्टकरी माऊलींच्या हातांची जादू आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा मेळ घालणाऱ्या ‘महालक्ष्मी सरस-२०२६' या महोत्सवाची ५ एप्रिल रोजी उत्साहात सांगता झाली. वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये १३ दिवस चाललेल्या ‘महालक्ष्मी सरस-२०२६' या महोत्सव मध्ये तब्बल २२ कोटी रुपयांच्या उत्पादनांची विक्रमी विक्री झाली असून, ग्रामीण महिलांनी उद्योजकतेचा नवा इतिहास नवी मुंबई शहराच्या भूमीत लिहिला आहे.  ‘महालक्ष्मी सरस-२०२६' या प्रदर्शनात ग्रामीण महिलांच्या कष्टाचे सोने झाले असून, होम डिलिव्हरी आणि स्मार्ट सुविधांमुळे या महोत्सवात नवी मुंबई, मुंबईकरांनी खरेदीचा आनंद लुटला.    

२४ मार्चपासून सुरु झालेल्या ‘महालक्ष्मी सरस-२०२६' या प्रदर्शनात ४९० स्टॉल्सवर मुंबई आणि नवी मुंबईकरांनी खरेदीसाठी झुंबड उडवली. शेवटच्या सहा दिवसांत तर जनसागराचा महापूर लोटल्याने आयोजकांना प्रदर्शनाचा कालावधी वाढवावा लागला. ग्राहकांचा प्रतिसाद केवळ खरेदीपुरता मर्यादित नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळालेला एक भक्कम आधार ठरला आहे. यंदाच्या प्रदर्शनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे २५ किलोमीटर अंतराच्या परिघात दिलेली मोफत घरपोच सेवा. जड पिशव्यांचे ओझे वाहण्याची कटकट नसल्याने ग्राहकांनी पोतीभर धान्य, मसाले, सेंद्रिय गूळ आणि हस्तकला वस्तूंची मुक्तहस्ते खरेदी केली. या एका सुविधेमुळे उलाढालीचा आकडा थेट २२ कोटींच्या पार गेल्याचे बोलले जात आहे.  

प्रदर्शनात पहिल्या दिवसापासूनच नामवंत कलाकारांनी हजेरी लावली. अनेक सेलिब्रेटींनी महिला उद्योजिकांशी संवाद साधत व्होकल फॉर लोकलचा संदेश देणारे ‘रील्स' सोशल मीडियावर शेअर केले. परिणामी, तरुण पिढीही मोठ्या संख्येने या प्रदर्शनाकडे आकर्षित झाली. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी उपलब्ध करून दिलेली ‘क्लॉक रुम' आणि विश्रांती कक्षाची सुविधा प्रदर्शनाचे संवेदनशिल पाऊल ठरली. महोत्सवाच्या समारोपप्रसंगी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गटांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.  

‘महालक्ष्मी सरस-२०२६' या प्रदर्शनाला नवी मुंबईकरांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे ग्रामीण महिलांच्या जिद्दीला नवे बळ मिळाले आहे. तंत्रज्ञान आणि परंपरेची सांगड पुढील काळात ‘लखपती दीदी'च्या मोहिमेला अधिक वेगवान करेल, असा विश्वास ‘उमेद'चे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांनी व्यक्त केला.

प्रदर्शनात उत्कृष्ट कामगिरी करणारे गट
खाद्य विभाग : नंदनम बचतगट (ज्यूस स्टॉल), एर्नाकुलम, केरळ.
बेस्ट सेलिंग (महाराष्ट्र): समृध्दी समूह (मोरिंगा पावडर), नांदेड.
नाविन्यपूर्ण उत्पादनः गोपाल कृष्ण समूह (मल्टीमिलेट खिचडी), जळगाव आणि ज्ञानज्योती समूह (रोस्टेड भेळ), सातारा.
शेतकरी उत्पादक कंपनी (एफपीसी): कोकण कन्या एफपीसी (देवगड) आणि शिखर धारा एफपीसी (भंडारा).
इतर राज्येः जीवनसाथी एस.जी.एस.वाय. गट (कपडे), पश्चिम बंगाल. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कोपरी उड्डाणपुलावरून हायड्रॉलिक क्रेन कोसळली