कोपरी उड्डाणपुलावरून हायड्रॉलिक क्रेन कोसळली 

 

ठाणेः  कोपरी उड्डाणपुलावर साकेत उन्नत मार्गाचे बांधकाम सुरू असताना एक हायड्रॉलिक क्रेन अचानक कोसळल्याची घटना ८ एप्रिल रोजी घडली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु क्रेन कोसळल्यामुळे पुलाचा काही भाग अडवला गेला होता. त्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे मोठे हाल झाले होते.

क्रेन कोसळल्यामुळे ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पूर्व द्रुतगती महामार्गावर  तीनहात नाका आणि नितीन कंपनी जंक्शनपर्यंत वाहतुकीचा वेग मंदावला आहे. वाहतूक पोलिसांनी हलक्या वाहनांना अंतर्गत मार्गावरून किंवा ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन केले होते. मात्र, अवजड वाहनांची मोठी रांग लागल्याने चित्र दिसत होते.

घटनेची माहिती मिळताच ठाणे शहर वाहतूक विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.  कोसळलेली हायड्रॉलिक क्रेन बाजूला करण्यासाठी मोठ्या क्षमतेची दुसरी क्रेन मागवण्यात आली आहे. मार्गावरील अडथळा दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. नंतर ही क्रेन हटवल्याने वाहतूक सुरळीत झाली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

२०३० पर्यंत ठाणे बनणार '१५० बिलियन डॉलर'ची अर्थव्यवस्था! -सचिन मिराणी