युवतीचा प्रामाणिकपणा!
अंबरनाथ : ‘अंबरनाथ नगरपरिषद'च्या कार्यालयामध्ये प्रामाणिकपणाचे प्रेरणादायी उदाहरण पहायला मिळाले. कर भरण्यासाठी आलेल्या दामिनी चंद्रकांत पेडणेकर या युवतीला कर विभागाच्या दरवाज्यासमोर अंदाजे २८ हजार रुपये इतकी रक्कम सापडली. पण, सदरची रक्कम स्वतःकडे न ठेवता दामिनी पेडणेकर हिने प्रामाणिकपणे ती तेथे उपस्थित असलेल्या महिला सुरक्षा रक्षक शामल ताडगे यांच्याकडे सुपूर्द केली.
या घटनेची माहिती मिळताच ‘नगरपरिषद'चे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड आणि कर अधीक्षक नरेंद्र संख्ये यांनी दामिनी पेडणेकर हिच्या प्रामाणिकपणाचे विशेष कौतुक करुन तिचा सत्कार केला.
दरम्यान, सदर रक्कम कोणाची असल्यास संबंधित नागरिकांनी आवश्यक पुराव्यासह अंबरनाथ नगरपरिषद कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दामिनी पेडणेकर हिच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.