राज्यातील ५ शहरांना स्वच्छतेचे मार्गदर्शन

नवी मुंबई : देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहराच्या ‘सुपर स्वच्छ लीग'मध्ये नवी मुंबईचा समावेश असून ‘स्वच्छ सर्वेक्षण' अंतर्गत ‘स्वच्छ शहर जोडी' संकल्पनेमध्ये ‘मार्गदर्शक शहर (मेंटॉर सिटी) म्हणून नवी मुंबईकडे कन्नड, जिंतूर, केज या ३ नगरपंचायती तसेच लोणार आणि मलकापूर या २ नगरपरिषदांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे.

त्यानुसार महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वच्छ शहर जोडी' उपक्रमाचे नोडल अधिकारी म्हणून अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली नवी मुंबई महापालिकेच्या स्वच्छता अधिकारी यांच्या समुह गटाने नुकतीच या पाचही शहरांमध्ये पाहणी करुन स्वच्छता विषयक सुधारणांसाठी मौलिक सूचना केल्या.

या वर्षीपासून ‘स्वच्छ भारत मिशन'च्या वतीने ‘स्वच्छ शहर जोडी' उपक्रमांतर्गत देशातील १९६ शहरांना मार्गदर्शन करण्यासाठी एकूण ७२ मार्गदर्शक शहरांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये ‘सुपर स्वच्छ लीग' मध्ये समाविष्ट नवी मुंबई महापालिकेवर ३ नगरपंचायती आणि २ नगरपरिषदा यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.

स्वच्छ शहर जोडीमध्ये स्वच्छतेच्या उत्तम पातळीवर असलेल्या शहराचे मागदर्शन स्वच्छतेबाबत सुधारणेसाठी प्रयत्नशील असणाऱ्या शहरांना मिळावे, अशी भूमिका असून घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता व्यवस्थापनातील उत्तम पद्धती, सार्वजनिक स्वच्छता व नागरिक सहभाग अशा सर्वच बाबतीत विचारांचे आदान-प्रदान अपेक्षित आहे. त्याअनुषंगाने नवी मुंबई देशातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक असून त्यांचे मार्गदर्शन केंद्र सरकारने ठरविलेल्या महाराष्ट्रातील इतर ५ शहरांना मिळावे आणि या माध्यमातून त्यांच्या शहरातील स्वच्छतेला अधिक गुणवत्ता लाभावी, या दृष्टीने हासदर उपक्रम महत्वाचा असल्याचे लक्षात घेत ‘नमुंमपा'ने याबाबत पुढाकार घेतला आहे.

‘नमुंमपा'च्या पथकांनी सदर ५ शहरांमध्ये जाऊन तेथील स्वच्छता व्यवस्थापनाची पाहणी केली. त्याठिकाणी असलेली कचरा वर्गीकरणाची पध्दत, कचरा संकलनाची पध्दत, कचरा विल्हेवाटीची व्यवस्था, सार्वजनिक शौचालय व्यवस्था, जलस्त्रोत स्वच्छता अशा विविध बाबींची पाहणी करुन त्यामध्ये सुधारणा सुचविल्या. त्याचप्रमाणे माहिती प्रचार-प्रसिध्दी बाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध माध्यमांचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना केल्या. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत सिटी प्रोफाईलमध्ये दाखल करावयाच्या ऑनलाईन माहितीच्या पध्दतीचीही सविस्तर माहिती देऊन त्याविषयीच्या शंकांचे समाधानही करण्यात आले.

या पाहणीमध्ये ‘नमुंमपा'च्या अधिकाऱ्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांसोबत क्षेत्रभेटी देऊन स्वच्छता कार्याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी-कर्मचारी यांच्याशी संवाद साधतानाच तेथील नागरिकांशीही सुसंवाद साधून स्वच्छतेची स्थिती जाणून घेतली. स्वच्छता दररोज करण्याची गोष्ट असल्याने आणि त्यात नागरिक सहभाग अत्यंत महत्वाचा असल्याने त्यावर जास्तीत जास्त भर देण्यासाठी लोकसहभागातून नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबवावेत, असे सूचित करण्यात आले.

दुसरीकडे स्वच्छ शहर जोडीमधील पाचही शहरांतील अभ्यासगटाने नवी मुंबईला भेट देऊन येथील घनकचरा व्यवस्थापन प्रणालीतील विविध बाबींची पाहणी करावी आणि तशा प्रकारचे अनुकरण करावे, असे आवाहन त्यांना करण्यात आले.स्वच्छ शहर जोडी उपक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेकडे जबाबदारी देण्यात आलेल्या पाचही शहरांच्या स्वच्छतेमधील प्रगतीसाठी नवी मुंबई महानगरपालिका मार्गदर्शक शहर म्हणून कटीबध्द असून या माध्यमातून देशातील शहरांमध्ये आमुलाग्र स्वच्छता बदल व्हावा या संकल्पनेला मजबूत आधार दिला जात आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कल्याण ते सीएसएमटी सर्व लोकल १५ डब्यांच्या करा