नवी मुंबईतील प्रस्तावित F-4 Street Circuit कार रेस संदर्भात हरित लवादाकडे तक्रार
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील पाम बीच मार्ग व परिसरात प्रस्तावित F-4 Street Circuit कार रेस संदर्भात सार्वजनिक हित, पर्यावरणीय परिणाम तसेच सार्वजनिक निधीच्या वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपशहरप्रमुख समीर अमीन बागवान यांनी यासंदर्भात सविस्तर निवेदन आयुक्त, नवी मुंबई महापालिका तसेच शहर अभियंता यांना दिले आहे.
तसेच या प्रकरणाबाबत पर्यावरणीय परिणामांचा विचार करून राष्ट्रीय हरित लवाद (National Green Tribunal), पश्चिम विभाग – पुणे येथेही तक्रार पाठविण्यात आली आहे.
उपलब्ध कागदपत्रे व प्राथमिक माहितीनुसार या प्रकरणात काही महत्त्वाच्या बाबी निदर्शनास येत आहेत. त्यामध्ये रस्त्यांच्या दोष निवारण कालावधीत (Defect Liability Period) पुन्हा नवीन कामे काढणे, मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक निधी खर्च होण्याची शक्यता, विविध विभागांच्या आवश्यक परवानग्यांचा प्रश्न तसेच शहरातील वाहतूक व्यवस्था व नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम यांचा समावेश आहे.
तसेच पाम बीच मार्ग परिसरात तलाव, जलस्रोत व जैवविविधता असलेला संवेदनशील परिसर असल्यामुळे अशा प्रकारच्या मोटर रेसमुळे ध्वनी प्रदूषण, प्रकाश प्रदूषण व पर्यावरणीय परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार या प्रकल्पामुळे या परिसरातील सुमारे ९७ वृक्ष बाधित होण्याची शक्यता असून त्यामुळे स्थानिक पर्यावरणीय संतुलनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे Environmental Impact Assessment (EIA) करण्यात आला आहे का व पर्यावरण संरक्षणाशी संबंधित नियमांचे पालन झाले आहे का, याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
या सर्व बाबींचा विचार करून F-4 Street Circuit प्रकल्पासंबंधी सर्व कामांची स्वतंत्र चौकशी करावी, सार्वजनिक निधीचा वापर नियमांनुसार झाला आहे का याची पडताळणी करावी तसेच आवश्यक पर्यावरणीय व प्रशासकीय परवानग्यांची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर बाब सार्वजनिक हित, पर्यावरण संरक्षण आणि आर्थिक पारदर्शकतेशी संबंधित असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
– समीर अमीन बागवान
उपशहर प्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे).