वारंवार लागणाऱ्या आगींमुळे औद्योगिक सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

अंबरनाथ : अंबरनाथ मधील आनंदनगर औद्योगिक वसाहत सध्या उत्पादनापेक्षा भीषण आगींच्या घटनांमुळेच जास्त चर्चेत येत आहे. ९ मार्च रोजी श्री गणेश केमिकल कंपनीला लागलेल्या भीषण आगीने पुन्हा एकदा या परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. सुदैवाने, कामगारांची सुट्टी झाल्यानंतर आग लागल्याने मोठा नरसंहार टळला, तरीही १२ पेक्षा अधिक स्फोटांच्या मालिकेने आणि आकाशात पसरलेल्या काळ्या धुराने संपूर्ण शहर दहशतीखाली होते. मात्र, सदरचा केवळ एक अपघात नसून प्रशासकीय दुर्लक्ष आणि सुरक्षा नियमांच्या पायमल्लीचा परिणाम असल्याचे चित्र दिसत आहे.

स्फोटांची मालिका आणि दहशतीचे वातावरण...
९ मार्च रोजी सायंकाळी ५.३०च्या सुमारास जेव्हा श्री गणेश केमिकल कंपनीतून आगीच्या ज्वाळा बाहेर पडू लागल्या, तेव्हा काही वेळातच रासायनिक ड्रम्सचे एकामागोमाग एक स्फोट होऊ लागले. या स्फोटांचा आवाज इतका प्रचंड होता की, परिसरातील घरांना धक्के बसले. हवेतून पसरलेल्या रसायनांमुळे सदर आग शेजारील मिरॅकल आणि आय क्लाऊड ९ या कंपन्यांपर्यंत पोहोचली. अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर आणि कल्याण-डोंबिवली अशा ५ शहरांच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनी शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली, तरीही कोट्यवधींचे नुकसान टाळता आले नाही.

अपघातांचा काळा इतिहासः प्रशासन झोपले आहे का?

अंबरनाथ एमआयडीसीमध्ये आगींचे सत्र नवीन नाही. गेल्या काही वर्षांतील घटनांवर नजर टाकली तर सुरक्षेच्या चिंधड्या उडाल्याचे स्पष्ट होते.

११ जून २०२५ मध्ये वडोल एमआयडीसी मधील कर्जत - कल्याण राज्यमार्गजवळ असलेल्या सिमरन सुझुकी या मोटारसायकलच्या शोरुमला आग लागून शेकडो मोटारसायकल सह शोरुम जळून खाक झाला होता.
२१ जुलै २०२४ मध्ये मोरवली एमआयडीसी जवळ असलेल्या बुवापाडा परिसरात बेकायदेशीररित्या प्लास्टिक दाने बनविणाऱ्या कंपनीला आग लागून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली होती.
१० जून २०२३ मध्ये ब्लू जेट हेल्थ केअरमध्ये रिॲक्टरचा स्फोट होऊन एका कामगाराचा मृत्यू झाला होता.
२३ जुलै २०२३ मध्ये दशमेश फोम इंडस्ट्रीज संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आणि सुमारे ९ कोटींचे नुकसान झाले.
२०२३ मध्ये कॅनरा इंजिनिअरिंग कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडून कंपनीची राख झाली.
डम्पिंग ग्राऊंड-उद्योगांशिवाय चिखलोली डम्पिंग ग्राऊंडला लागणाऱ्या आगींमुळे नागरिकांचे श्वसनाचे विकार बळावले आहेत.

१५०० उद्योग अन्‌ सुरक्षेचा पत्ता नाही...
अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागात मिळून ३ एमआयडीसींमध्ये १५०० पेक्षा जास्त कंपन्या कार्यरत आहेत. यात केमिकल आणि औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची संख्या मोठी आहे. नियमानुसार प्रत्येक कंपनीत फायर ऑडिट, आपत्कालीन यंत्रणा आणि रासायनिक साठवणुकीचे कडक नियम असणे अनिवार्य आहे. मात्र, वारंवार होणारे स्फोट सिध्द करतात की, या नियमांची अंमलबजावणी केवळ कागदावरच मय्राादित आहे. वाढत्या उन्हाळ्यामुळे रसायनांच्या साठवणुकीत तांत्रिक खबरदारी घेणे आवश्यक असतानाही, अनेक कंपन्यांकडे अग्निशमन उपकरणांची वानवा आहे.

कामगार, नागरिकांचा सवालः आमचा जीव इतका स्वस्त?
औद्योगिक क्षेत्रात लागणाऱ्या आगींचा धूर बदलापूर आणि अंबरनाथ शहराच्या निवासी भागांपर्यंत पोहोचत आहे. केमिकलच्या उग्र वासामुळे लहान मुले आणि वृद्धांना श्वसनाचा त्रास होत असून, भविष्यात मोठी आपत्ती ओढवण्याची भिती व्यक्त केली जात आहे. केवळ पंचनामे आणि तपासाचे आश्वासन देण्यापेक्षा, दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई आणि सुरक्षा यंत्रणेचे सक्तीचे ऑडिट केव्हा होणार? असा प्रश्न आता अंबरनाथकर विचारत आहेत. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईतील प्रस्तावित F-4 Street Circuit कार रेस संदर्भात हरित लवादाकडे तक्रार