उष्णतेचा वाढता पारा; ‘ठामपा'चा ‘हीट ॲक्शन प्लॅन

ठाणे : ठाणे शहरात तापमानाचा पारा वाढू लागल्याने नागरिकांना उन्हाच्या तीव्रतेपासून दिलासा देण्यासाठी ठाणे महापालिकेने उष्णता कृती आराखड्याची (Heat Action Plan) अंमलबजावणी सुरु केली आहे. या अंतर्गत गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही शहरातील सिग्नलवर प्रतिक्षेत उभ्या असलेल्या वाहनचालकांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी जाळीचे आच्छादन उभारण्यात येणार आहे. तसेच विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने शहरातील २५ गर्दीच्या ठिकाणी तात्पुरत्या पाणपोई सुरु करण्यात येणार आहेत.

गेल्या काही वर्षांपासून ठाणे शहरात उन्हाळ्यात तापमानात लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यातही पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होत असल्याने वातावरणीय बदलांचा परिणाम शहरावर जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य संकटांचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेने सर्वंकष उष्णता उपाययोजना आराखडा तयार केला आहे. महाराष्ट्र शासन, ठाणे महापालिका आणि काऊन्सिल ऑफ एनर्जी, एन्व्हायर्नमेंट अँड वॉटर या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सदरचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून महापालिका या आराखड्याची अंमलबजावणी करत असून वातावरणीय बदलांमुळे उद्‌भवणाऱ्या परिणामांवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. दरम्यान, गेल्या १० दिवसांपासून शहरातील तापमानाचा पारा वाढू लागला असून तो सुमारे ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी महापालिकेने तत्काळ पावले उचलली  आहेत.

यानुसार, शहरातील महत्त्वाच्या सिग्नलजवळ जाळीचे आच्छादन टाकण्यात येणार आहे. सिग्नलच्या प्रतिक्षेत उभ्या असलेल्या वाहनचालकांना थेट उन्हाचा सामना करावा लागू नये, यासाठी सदर उपाययोजना केली जात आहे. त्याचबरोबर शहरातील २५ गर्दीच्या ठिकाणी पाणपोई सुरु करण्यात येणार असून येथे मोठे माठ आणि ग्लास ठेवण्यात येणार आहेत. या पाणपोईंमध्ये दररोज शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था संबंधित स्वयंसेवी संस्थांकडून करण्यात येणार आहे.

दरम्यान, या उपाययोजनांमुळे नागरिकांना वाढत्या उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळेल, अशी अपेक्षा महापालिकेकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वारंवार लागणाऱ्या आगींमुळे औद्योगिक सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह