आता महिलांच्या हाती एनएमएमटी बसचे स्टेअरींग
नवी मुंबई : ‘जागतिक महिला दिन'निमित्त नवी मुंबई महापालिकेच्या वतीने विष्णुदास भावे नाट्यगृह येथे संपन्न झालेल्या विशेष समारंभ प्रसंगी मनोगत व्यक्त करताना ‘नवी मुंबई'च्या महापौर सुजाता पाटील यांनी महिलांचे आर्थिक सक्षमीकरण म्हणजेच खऱ्या अर्थाने स्त्री सक्षमीकरण असल्याचे सांगत या पुढील काळात महापालिका क्षेत्रातील महिलांना विविध माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरणावर भर देण्यात येईल, असे स्पष्ट केले होते.
या अनुषंगाने राज्याचे वनमंत्री ना. गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमात (एनएमएमटी) पहिल्या टप्प्यात ४०० महिला भगिनींना बस चालक या पदावर रुजू करण्याच्या अनुषंगाने पावले उचलण्यात येत असल्याचे महापौर सुजाता पाटील यांनी जाहीर केले. याकरिता महिलांना बस चालकाचे संपूर्ण प्रशिक्षण देण्याची जबाबदारी महापालिका समाजविकास विभागावर देण्यात आली असून या विभागाच्या माध्यमातून प्राधान्याने नवी मुंबईत वास्तव्य असणाऱ्या महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे.
या माध्यमातून स्त्री सक्षमीकरणाचे नवे दालन नवी मुंबईत खुले होणार असून प्रत्येक बाबतीत आघाडीवर असणाऱ्या ‘नवी मुंबई'च्या उपक्रमांचे अनुकरण इतरही शहरात होईल, असा विश्वास वाटतो.
-सुजाता पाटील, महापौर-नवी मुंबई.