नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

नवी मुंबई:- नवी मुंबईतील विकासकामांना गती मिळावी तसेच प्रलंबित प्रश्न मार्गी लागावे, याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. यावेळी नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, महामंत्री डॉ. राजेश पाटील, माजी सभापती डॉ.जयाजी नाथ, माजी नगरसेवक अशोक गुरखे, सुनील पाटील, निलेश म्हात्रे, अविनाश भगत उपस्थित होते. नवी मुंबई महापालिकेला स्वच्छतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याने तसेच शासकीय सुपरस्पेशालीस्ट हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजची प्रक्रिया जलद केल्यामुळे आयुक्त अभिजित बांगर यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी महिला भवन व बालभवन उभारण्याकरिता सिडकोकडून भूखंड हस्तांतरण प्रक्रिया लवकरात लवकर करणे, सानपाडा येथील लायब्ररी उभारण्याची कार्यवाही सुरु करणे, बेलापूर विभागातील ग्रामस्थ महिलांना सद्गुरू बैठकीकरिता दिवाळे येथे समाज मंदिर बांधणे, नवी मुंबईमध्ये डास प्रतिबंधक उपचार करणे, बेलापूर गाव येथील नियोजित मार्केटचे भूमिपूजन करणे, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाला "धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मुख्यालय" असे नामकरण करणे अशा अनेक विषयांवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. आयुक्त बांगर यांनीही सकारात्मक निर्णय घेत सदर सर्व विषय तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी उपास्थित रामचंद्र घरत, डॉ.जयाजी नाथ, अशोक गुरखे, सुनील पाटील यांनी आपआपल्या प्रभागातील समस्या व मागण्या आयुक्तांपुढे कथन केल्या.

यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, लवकरच शासकीय हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज उभारणीची प्रक्रिया पूर्ण होणार असून सर्व कामकाज जलद पद्धतीने केल्याबद्दल पालिका आयुक्त व सिडको एमडी यांचे मी मनापासून आभार मानते. विविध प्रलंबित विषय मार्गी लागावे व विकास कामांना गती मिळावी, याकरिता आज पालिका आयुक्त यांची भेट घेतली. कोरोना व ओमिक्रोन चा प्रादुर्भाव पाहता सुपर स्पेशालीस्ट हॉस्पिटल होणे ही काळाची गरज आहे. मेडिकल कॉलेज सुरू झाल्यास सामान्य घरातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे. महिला भवन व बालभवन निर्माण झाल्याने नवी मुंबईतील महिला व विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळेल. सानपाडा येथे सुसज्ज असे ग्रंथालय निर्मिती होणार असल्याने नवी मुंबईच्या विकासात भर पडणार आहे. आपण केलेल्या मागणीचा पाठपुरावा करणे हा माझ्या कामाचा एक भाग असून जो पर्यंत संपूर्ण प्रश्न मार्गी लागत नाही तो पर्यंत असाच पाठपुरावा सातत्याने मी करत असल्याचे आमदार सौ.मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

Read Next

नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांची बदली