सफाई कर्मचाऱ्याची हत्या
उल्हासनगर : कचरा उचलण्याच्या किरकोळ वादातून सफाई कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना ९ मार्च रोजी समोर आली आहे. पतीच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने पत्नीनेही आत्महत्येचे पाऊल उचलल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. कॅम्प नंबर-३ मधील बॅरक नंबर ८९६ परिसरात सदर घटना घडली असून शहाड गांवठाण येथे राहणारे ३२ वर्षीय महादू जगताप यांची कोयत्याने ३२ वार करुन हत्या करण्यात आली आहे.
महादू जगताप कोणार्क इन्व्हायरो कंपनीत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होते आणि पॅनल नंबर ११ मध्ये आपली सेवा देत होते. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील रहिवासी दुर्गेश कुमार गुप्ता कचरा थेट घरातून उचलण्यावरुन महादू यांच्याशी सतत वाद घालत होता, तर महादू यांनी कचरा डब्यात टाकल्यास तो तिथून उचलला जाईल, अशी भूमिका घेतली होती. नेहमीसारखे सकाळी याच कारणावरून दोघांमध्ये पुन्हा शाब्दिक चकमक झाली आणि संतापलेल्या गुप्ता याने महादू यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले, ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच महादू यांच्या पत्नी पूर्वा जगताप यांनी रुग्णालयात धाव घेतली. मात्र, पतीचा मृतदेह पाहून त्यांना मोठा मानसिक धक्का बसला. पतीच्या विरहाने व्याकुळ झालेल्या पूर्वा यांनी घरी परतल्यानंतर गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. या दुहेरी घटनेमुळे जगताप कुटुंबातील २ा निष्पाप मुले अनाथ झाली असून संपूर्ण उल्हासनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच मध्यवर्ती पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
याप्रकरणी पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी माहिती दिली की, आरोपीला पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. या संवेदनशील प्रकरणाचा पोलीस कसून तपास करीत आहेत. दरम्यान, महापौर अश्विनी कमलेश निकम यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले असून कोणार्क कंपनीशी चर्चा करुन पीडित कुटुंबाला योग्य ती मदत आणि नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.