घरगुती सिलेंडर महागला!

ठाणे : इराण-इस्त्रायल युध्दाचे कारण पुढे करीत सरकारने घरगुती गॅस सिलेंडरचे दर ६० रुपयांनी वाढविले आहेत. त्याच्या निषेधार्थ ‘राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष'चे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली महिलाध्यक्षा मनिषा भगत आणि युवक अध्यक्ष अभिजीत पवार यांच्या उपस्थितीत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘राष्ट्रवादी'च्या कार्यकर्त्यांनी चुल पेटवून त्यावर भात शिजवून तसेच भाकरी भाजत गॅस सिलंेडर दरवाढीचा निषेध केला.

इस्त्रायल आणि इराणमधील युध्दाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस सिलेंडरचे दर ६० तर व्यावसायिक सिलेंडरचे दर ११८ रुपयांनी वाढविण्यात आले आहेत. या दरवाढीचा निषेध करण्यासाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष'ने ‘चुल्हा जलाओ' आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. तसेच चुलीवर भात शिजवला आणि भाकरी देखील भाजल्या.

याप्रसंगी मनोज प्रधान म्हणाले, अमेरिका ठरवेल ते आपल्या देशाचे धोरण झाले आहे. त्यामुळेच युध्दाच्या पार्श्वभूमीवर सिलेंडर दरवाढ करण्यात आली आहे. या युध्दाचा अंदाज आलेला असतानाही सरकारला नियोजन करता आले नाही, यावरुन या सरकारची धोरणे कशी तकलादू आहेत, हेच स्पष्ट झाले आहे. गॅस सिलंेडर दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या घरातील बजेट कोलमडून पडणार आहे. एकीकडे महिलांना लाडकी बहिण म्हणायचे आणि दुसरीकडे महिला दिनाच्या एक दिवस आधी दरवाढ लादून दरवाढीची भेट द्यायची, असे खपवून घेतले जाणार नाही. आजचे आंदोलन प्रातिनिधिक असले तरी महागाई विरोधातील आमचा लढा असाच कायम राहणार असल्याचे प्रधान यांनी स्पष्ट केले.

तर सरकारने युध्दाच्या नावाखाली दरवाढ केली आहे. दरवाढ म्हणजे भारतीय जनतेची लूट आहे. आधीच महागाई वाढलेली असताना अशी दरवाढ करणे योग्य नाही. सरकारने केलेली सिलेंडर दरवाढ तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणी मनिषा भगत यांनी यावेळी केली.

या आंदोलनात युवक अध्यक्ष अभिजीत पवार, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, विद्यार्थी अध्यक्ष राहू पाटील, महिला कार्याध्यक्ष फुलबानो पटेल, साबिया मेमन, जिल्हा प्रशासन सरचिटणीस राजेश साटम, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मकसुद खान, राजू चापले, मिलिंद बनकर, एकनाथ जाधव, संगीता लोकरे, कैलास हावळे, दीपा गावंड, शशिकला पुजारी, मल्लिका पिल्ले, मनीषा पाटील, कुणाल भोईर, सचिन पंधरे, जगत सिंग, सुमित साधवाणी, शिवा कालू सिंह, पुजा जाधव, रेश्मा भानुशाली, विशांत गायकवाड, महेश मोरे, पद्माकर पाटील, राजू पाटील, साहिल उदुगडे, आदि सहभागी झाले होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

शिवमंदिर सुशोभिकरण प्रकल्प