पाणी टंचाईमुळे ‘सुखी होळी'ला प्राधान्य

खारघर : यंदा वाढत्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर खारघर परिसरातील नागरिकांनी पर्यावरणपूरक आणि ‘सुखी होळी' साजरी केली. गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने होत असलेला पाणीपुरवठा, वाढते तापमान आणि साठ्यांवरील ताण यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे रंगांची उधळण करताना पाण्याचा अपव्यय टाळण्याचा निर्धार अनेक सोसायट्यांनी केला आहे.

खारघर परिसरात दरवर्षी होळी, धुलवड खेळताना मोठया प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. सोसायटीचे पाणी थेट रस्त्यावर येत असते. मात्र, यावर्षी विविध गृहनिर्माण संस्थांनी यंदा पाण्याऐवजी नैसर्गिक गुलाल आणि स्पीकर लावून होळीच्या विविध गाण्यांवर धमाल केले. नागरिक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून होळी धुळवड खेळताना दिसून आले. काही सोसायटीत  मुलांसाठी पारंपरिक खेळ, नृत्यस्पर्धा आणि समाजप्रबोधनपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. होळी आनंदाची असते, पण पाण्याची नासाडी करुन नाही, अशी भूमिका अनेक रहिवाशांनी व्यक्त केली.

होळी-धुळवड सणानिमित्त सिडको प्रशासनानेही पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले होते. सणासुदीच्या काळात पाण्याचा अनावश्यक वापर टाळावा, असे वारंवार सूचित केले होते. काही भागांत नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने पुढाकार घेत ‘सुखी होळी'चा पर्याय स्वीकारला आहे.

उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्याची मागणी वाढली असून साठे मर्यादित आहेत. नागरिकांनी सहकार्य केल्यास येत्या काही महिन्यात पाणी व्यवस्थापन सुलभ होईल, असे खारघर गावातील ॲड. सचिन कांबळे यांनी सांगितले. दरम्यान, पर्यावरणप्रेमी संघटनांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. पाण्याची बचत काळाची गरज असून सण साजरे करतानाही सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले  

एकूणच, पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर खारघरकरांनी यंदा जाणीवपूर्वक ‘सुखी होळी' साजरी करण्याचा घेतलेला निर्णय  पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने टाकलेले सकारात्मक पाऊल मानले जात आहे. नागरिकांच्या या जागरुकतेमुळे इतर भागांनाही प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

निर्भया पथकाच्या गाडीवर मद्यधुंद सारथी; खारघरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा