निर्भया पथकाच्या गाडीवर मद्यधुंद सारथी; खारघरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

नवी मुंबई : महिलांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या नवी मुंबई पोलिसांच्या ‘निर्भया' पथकाची गाडीच मद्यधुंद तरुणाने पळवल्याचा धक्कादायक प्रकार खारघरमध्ये उघडकीस आला आहे. २ मार्च रोजी रात्री खारघरमधील बेलपाडा परिसरात या मद्यधुंद चालकाने नागरिकांना मारहाण करत धिंगाणा घातला. धक्कादायक बाब म्हणजे सदर तरुण पोलीस नसून चक्क सहाय्यक पोलीस आयुवत कार्यालयातील सफाई कामगार असल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि शिस्तीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण खारघर येथील साहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात साफसफाई आणि पाणी देण्याचे काम करतो. २ मार्च रोजी रात्री १०.३० ते ११ च्या सुमारास ‘होळी'च्या निमित्ताने त्याने बेभान मद्यपान केले होते. नशेत असतानाच त्याने कार्यालयातील निर्भया पथकाची गाडी ताब्यात घेतली आणि ती रस्त्यावर आणली.

सदर तरुण खारघर मधील बेलपाडा परिसरात गाडी घेऊन पोहोचल्यानंतर तेथे रिक्षा चालकासोबत त्याचा वाद झाला. नशेत असलेल्या या तरुणाने केवळ वादच घातला नाही, तर गाडीतून उतरुन तिथे असलेल्या काही नागरिकांना विनाकारण मारहाण करण्यास सुरुवात केली. नागरिकांनी त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता, त्याने पोलीस गाडीचा रुबाब दाखवत त्यांनाही धमकावले. मात्र, त्याच्या हालचालींवरुन तो मद्यधुंद असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले.

ज्या गाडीतून पोलीस महिलांच्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी आणि जनतेला निर्भय करण्यासाठी कारवाई करतात, तीच गाडी मद्यधुंद खाजगी व्यक्तीच्या हातात कशी पडली? असा सवाल आता नवी मुंबईकर विचारत आहेत. शहरात गुन्हेगारी वाढत असताना पोलिसांच्या गाड्या इतक्या असुरक्षित कशा? यावर संताप व्यक्त होत आहे.

याप्रकरणी खारघर पोलिसांनी संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे. मात्र, पोलीस कार्यालयातील गाडीची चावी बाहेरील व्यक्तीच्या हाती लागलीच कशी? याचा तपास आता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. मद्यधुंद अवस्थेत निर्भया पथकातील वाहन घेऊन जाणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नोव्हेंबर पासूनचा पगार थकला