‘नशा मुक्त नवी मुंबई'चा दणका
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कडून मुद्देमालाची विल्हेवाट
नवी मुंबई : समाजातील अंमली पदार्थांच्या वाईट प्रवृत्तीचे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने, नवी मुंबई पोलिसांनी होळीच्या मुहूर्तावर तब्बल १८ कोटी ६३ लाख ३४ हजार रुपये किमतीचे अंमली पदार्थ तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लि. या कंपनीमध्ये शास्त्रोेक्त पध्दतीने नष्ट करुन त्याची विल्हेवाट लावली. नष्ट करण्यात आलेल्या अंमली पदार्थामध्ये एमडी, हेरॉईन, कोकेन, गांजा, चरस, अफीम यासारख्या घातक अंमली पदार्थाचा समावेश आहे. यावेळी पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, सह-पोलीस आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, गुन्हे शाखेचे उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबईला अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सुरु केलेल्या ‘नशा मुक्त नवी मुंबई' अभियानात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने अंमली पदार्थांविरोधात सातत्यपूर्ण आणि कठोर भूमिका घेतली आहे. २६ सप्टेंबर २०२५ पर्यंत पोलिसांनी ११४ गुन्ह्यांतील ३८ कोटी ४५ लाख रुपयांचा मुद्देमाल आधीच नष्ट केला होता. त्याच मोहिमेचा पुढचा टप्पा म्हणून २ मार्च रोजी होळीच्या दिवशी ५५ गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेला अंमली पदार्थाचा साठा नष्ट करण्यात आला.
परदेशी ड्रग्ज पेडलर्स ब्लॅकलिस्ट...
नवी मुंबईत बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या आणि अंमली पदार्थांच्या व्यापारात गुंतलेल्या आफ्रिकन नागरिकांविरुध्द पोलिसांनी गेल्या ३ वर्षांत मोठी मोहीम उघडली आहे. यात १५२९ नागरिकांना हद्दपार करण्यात आले. तसेच ९११ आफ्रिकन नागरिकांना ब्लॅकलिस्ट करण्यात आले आहे. तसेच सराईत गुन्हेगारांविरुध्द थेट मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे परदेशी ड्रग्ज पेडलर्सच्या कारवायांना चांगलाच आळा बसला आहे.
पंजाबमधील सबा टोळीचा पर्दाफाश...
नवी मुंबईतील हॉटेल, लॉज आणि पीजीमध्ये राहून ट्रक आणि रेल्वेमार्गे नवी मुंबईत अंमली पदार्थ आणून त्याची विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीलाही नवी मुंबई पोलिसांनी उध्वस्त केले आहे. नवी मुंबई पोलिसांनी पंजाबमधील या टोळीचा मुख्य सूत्रधार साहीबसिंग ऊर्फ सबा याला अमृतसरमधून अटक करुन या टोळीकडून तब्बल ४ कोटी २० लाखांचे हेरॉईन, अफु आणि मेफेड्रोन या सारखे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
प्रत्येक पोलीस ठाण्यात एएनएस पथक...
अंमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक तीव्र आणि प्रभावी करण्यासाठी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र ॲन्टी नार्कोटिक स्क्वॉड स्थापन केले आहे. एएनएस पथक शाळा, महाविद्यालये आणि संवेदनशील भागांवर करडी नजर ठेवून अंमली पदार्थांची खरेदी विक्री करणाऱ्या आरोपींची धरपकड करणार आहे.
नागरिकांसाठी हेल्पलाईन...
अंमली पदार्थांविषयी माहिती देण्यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून ८८२८-११२-११२ असा विशेष हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे. अंमली पदार्थासंबधी माहिती देणाऱ्या नागरिकाचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाईल, अशी हमी पोलिसांनी दिली असून नागरिकांनी या लढ्यात निर्भयपणे सहभागी व्हावे, असे आवाहन नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत करण्यात आले आहे.