‘कल्याण'मध्ये डबल डेकर कॉरिडॉरवर मेट्रो मार्गिका
खा. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश
कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघातून जाणाऱ्या सर्व मेट्रो मार्गिका या डबल डेकर पध्दतीने उभारण्यात येणार आहेत. यामध्ये कल्याण-तळोजा मेट्रो १२, कांजूरमार्ग-बदलापूर मेट्रो १४, तसेच ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५, दुर्गाडी मार्गे कल्याण-उल्हासनगर-अंबरनाथ-चिखलोली येथे जाणारी ५ अ, शिळफाटा-रांजणोली उन्नतमार्ग, वालधुनी ते नेवाळी उन्नत मार्ग असे सर्व वाहतूक प्रकल्प डबल डेकर अर्थातच ‘खाली रस्ता वर पलायओव्हर' आणि जेथून मेट्रो मार्गिका जाणार आहे त्याठिकाणी वरती मेट्रो मार्गिका असे स्वरुप असणार आहे.
या प्रकल्पांच्या उभारणीसाठी ‘एमएमआरडीए'कडून काम सुरु आहे. तर मेट्रो-५ चे पुन्हा दोन टप्प्यात विस्तारीकरण करुन ५-ब ( चिखलोली ते बदलापूर ) तर ५-क (दुर्गाडी ते टिटवाळा) अशा मार्गिका उभारण्यात येणार आहे. तर मेट्रो-१२चे ही विस्तारीकरण करुन मेट्रो-१२ ब (शिळफाटा ते कळवा-मुंब्रा मार्गे ठाणे) अशी उभारणी करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत २ मार्च रोजी मुंबई येथे महत्वाची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी या मार्गांचे प्रस्ताव मांडले. ‘एमएमआरडीए'कडून देखील याला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला असून, याबाबत लवकरच आराखडा तयार करण्यात येणार आहे. खासदार शिंदे यांच्या पुढाकाराने उभारणी होत असलेल्या या प्रकल्पामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाहतूक व्यवस्थेला नवा आयाम प्राप्त होणार आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांबाबत एमएमआरडीए मुख्यालयात बैठक पार पडली. यावेळी बैठकीत मतदारसंघात सुरु असलेल्या वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, एमएमआरडीए अतिरिक्त आयुक्त अश्विन मुदगल यांची मुख्य उपस्थिती होती.
यावेळी बैठकीत ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो-५ प्रकल्पचे विस्तारित मार्गिका ५-अ दुर्गाडी नाका ते कल्याण मार्गे उल्हासनगरच्या कल्याण-बदलापूर मार्गाने बदलापूर आणि अंबरनाथ शहराच्या मध्यभागी उभे राहत असलेल्या चिखलोली रेल्वे स्थानकापर्यंत नेण्यात येणार आहे. यामुळे अंबरनाथ, उल्हासनगर आणि आजुबाजुच्या परिसरातील रहिवाशांना मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे गाठणे सोपे होणार आहे. तर मेट्रो-५ ब अशी मेट्रो मार्गिका चिखलोली रेल्वे स्थानकापासून थेट बदलापूर पर्यंत नेण्यासाठी आराखडा तयार करण्यात यावा. तर दुर्गाडी येथून थेट टिटवाळा पर्यंत जाण्यासाठी ५-क मेट्रो मार्गिका उभारण्यासाठी आराखडा तयार करण्यात यावा, अशा सूचना यावेळी दिल्या.
या दोन्ही मार्गिका झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल आणि कल्याणपलिकडच्या नागरिकांना ठाणे, नवी मुंबई, मुंबई गाठण्यासाठी विविध मेट्रो मार्गिका उपलब्ध असतील. याबाबत एमएमआरडीए आयुक्त डॉ. मुखर्जी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मेट्रो-१२ चे काम देखील सध्या जलदगतीने सुरु आहे. यातील मार्गात पिलर उभारणीचे तसेच स्थानक उभारणीचे काम सुरू आहे. याला अधिक वेग देण्याच्या सूचना यावेळी केल्या. याचसमवेत मेट्रो-१२ अ देखील नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. याबाबत देखील काम जलदगतीने करण्यात यावे. तर मेट्रो-१२ ब चा आराखडा तयार करण्यात यावा. यामध्ये मेट्रो-१२ ची एक विस्तारित मार्गिका शिळफाटा मार्गे, मुंब्रा-कळवा येथून जाईल आणि त्याची जोडणी पुढे थेट ठाण्याला होईल, अशा सूचना यावेळी खा. श्रीकांत शिंदे यांनी दिल्या.
दरम्यान, ऐरोली-काटई फ्री-वे दरम्यान आलेल्या काटई नाका येथील बोगद्याचे काम जलदगतीने पूर्णत्वास न्यावे. तर यातील टप्पा-३ साठी लागणाऱ्या जमिनीची भूसंपादन प्रक्रिया जलदगतीने पूर्णत्वास न्यावी, अशा सूचना यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी दिल्या. यासह मतदारसंघातील विविध महत्वाच्या प्रकल्पांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
वाहतुकीचा ताण कमी व्हावा आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी शिळफाटा-रांजनोली येथे द्विस्तरीय (डबल डेकर) रस्ता उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या रस्त्याची उभारणी साठी जलदगतीने निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना यावेळी दिल्या. कल्याण (पूर्व) यु टाईप आणि श्रीमलंग रस्त्याचे काम जलदगतीने मार्गी लावावे. यासाठी लागणाऱ्या जमिनीचे संपादन देखील लवकर करावे. तर या ठिकाणी बाधित होणाऱ्या नागरिकांना जवळील बीएसयुपी घरांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरीत करण्यात यावे. या दरम्यान या भागात क्लस्टर योजना राबवून येथील नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर बांधून देण्यात यावे, तर व्यवसायिकांना गाळे देण्यात यावे.
-डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार-कल्याण.