‘एआय'च्या मदतीने बोगस लर्निंग लायसन्स मिळवणारे रडारवर

पनवेल : ‘एआय'च्या मदतीने उमेदवार प्रत्यक्ष उपस्थित नसताना आरटीओ एजंटमार्फत शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्स) मिळवण्याचे गैरप्रकार होत असल्याचा गंभीर मुद्दा प्रशांत ठाकूर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे दाखल केला. आमदार ठाकूर यांनी राज्य शासनाचे लक्ष वेधताना नमूद केले की, काही ठिकाणी कृत्रिम बुध्दिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा गैरवापर करुन उमेदवाराची ओळख बनावटरित्या सादर केली जात आहे. संबंधित उमेदवार परीक्षा देण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही आरटीओ एजंटांच्या माध्यमातून ऑनलाईन चाचणी पूर्ण करुन शिकाऊ अनुज्ञप्ती मिळवली जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. या प्रकारामुळे परवाना वितरण प्रक्रियेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता धोक्यात येत असून, रस्ते सुरक्षेवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यावर शासनाकडून संबंधित विभागामार्फत तपास करुन आवश्यक ती कारवाई करण्याची गरज असल्याचे आ. प्रशांत ठाकूर यांनी अधोरेखित केले.  

राज्यात ‘एआय'च्या मदतीने उमेदवाराशिवाय शिकाऊ अनुज्ञप्तीची (लर्निंग लायसन्स) काही काही सेकंदात चाचणी द्यायची आणि उत्तीर्ण होऊन लायसन्स आरटीओ एजंटच्या मदतीने मिळवण्याचे तसेच ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन इत्यादी सेवांशी संबंधित बनावट वेबसाईट, फसवे मोबाईल ॲप्सद्वारे पाठविल्या जाणाऱ्या खोट्या लिंकच्या माध्यमातून नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे जानेवारी २०२६ मध्ये निदर्शनास आले आहे. सन २०२२ ते २०२५ या कालावधीत सुमारे ३२ लाख वाहन शिकण्यासाठीचे शिकाऊ अनुज्ञप्ती जारी केले असून त्यापैकी किती उमेदवारांनी शिकाऊ अनुज्ञप्ती चुकीच्या पध्दतीचा वापर करून मिळविला असल्याने आता परिवहन विभाग शोध घेणार आहे का? तसेच खोट्या लिंकद्वारे वाहन चालक-मालक यांची आर्थिक फसवणूक, वैयक्तिक माहितीची चोरी तसेच नागरिकांच्या ओळखीचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी शासनाने चौकशी करुन बनावट परवाने घेणाऱ्यांवर आणि देणाऱ्यांवर कारवाई करण्यासह शिकाऊ अनुज्ञप्ती रद्द करण्याकरिता तसेच बनावट वेबसाईट, मोबाईल ॲप्सला आणि भविष्यात अशा प्रकारच्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी कोणती कार्यवाही केली अथवा करणार, असा तारांकित प्रश्न आ. प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दाखल केला होता.

या प्रश्नावर राज्याचे परिवहन मंत्रो प्रताप सरनाईक यांनी आपल्या लेखी उत्तरात सांगितले की, ‘एआय'च्या मदतीने उमेदवाराशिवाय शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्स) ची काही काही सेकंदात चाचणी घ्यायची आणि उत्तीर्ण होऊन लायसन्स आरटीओ एजंटच्या मदतीने मिळवण्याचे तसेच ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन इत्यादी सेवांशी संबंधित बनावट वेबसाईट, फसवे मोबाईल ॲप्सद्वारे पाठविल्या जाणाऱ्या खोट्या लिंकच्या माध्यमातून नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत झाल्याची बाब अंशतः खरी आहे. सन २०२२ ते २०२५ या कालावधीत एकूण २८.३२ लाख शिकाऊ अनुज्ञप्ती जारी करण्यात आलेल्या आहेत. चुकीच्या पध्दतीचा वापर करुन मिळवलेल्या शिकाऊ अनुज्ञप्तीचा तपास राष्ट्रीय सूचना केंद्र, पुणे आणि सायबर पोलीस ठाणे, जालना यांच्यामार्फत सुरु आहे. परिवहन विभागाच्या बनावट लिंक तयार करुन वाहन चालक-मालक यांची आर्थिक फसवणूक केल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. तथापि, वाहन मालकांच्या माहितीची चोरी झाल्याबाबतच्या घटना निदर्शनास आलेल्या नाहीत.

राष्ट्रीय सूचना केंद्र दिल्ली यांना सुरक्षा ऑडीट करण्याची विनंती १ डिसेंबर २०२५ रोजीच्या पत्रान्वये करण्यात आली आहे. तसेच राज्यातील वाहन चालक आणि नागरिक यांना बनावट परिवहन वेबसाईट, मोबाईल ॲप्स तसेच खोट्या ई-चलन लिंकपासून सतर्क रहाण्याकरिता प्रसिध्दी देण्याबाबत महासंचालक, माहिती-जनसंपर्क महासंचालनालय यांना ९ डिसेंबर २०२५ रोजी विनंती करण्यात आली आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नागरिकांच्या विश्वासाला महापौरांकडून दाद