शिवजयंतीचा अभूतपूर्व उत्साह; भव्य मिरवणुकीने पनवेलनगरी दुमदुमली

पनवेल : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त पनवेल महापालिकेच्या वतीने शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. अश्वारुढ पुतळ्याच्या पुजनाने सकाळी सुरु झालेल्या या मिरवणुकीत ७ ऐतिहासिक चित्ररथ आणि १४ लेझीम पथकांनी नागरिकांचे लक्ष वेधले. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा जयघोषाने आणि ढोल-ताशांच्या गजराने संपूर्ण पनवेल नगरी शिवमय झाली होती.

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, महापालिका आयुक्त मंगेश चितळे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, उपविभागीय अधिकारी पवन चांडक, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, माजी नगरसेवक अनिल भगत, महापालिका अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, आदि उपस्थित होते.

सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्वारुढ पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आणि महाराष्ट्र गीताच्या सादरीकरणा नंतर ढोल ताशाच्या गजरात मिरवणुकीची सुरूवात झाली. या मिरवणुकीमध्ये पारंपारिक वेशभुषेमधील महिला, पुरुष, विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग घ्ोतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रांतील विविध प्रसंगाचे एकूण ७ चित्ररथ, महापालिकेच्या शाळा आणि खाजगी शाळा अशा विविध शाळांच्या विद्यार्थ्यांचे १४ लेझीम पथक, ढोल पथक, बॅन्जो पथक याचा समावेश होता. दांडपट्टा तलवारबाजी लेझीम अशा शिवकालीन मैदानी खेळांचे (पाच ठिकाणी ) सादरीकरण करण्यात आले. सदर कला सादरीकरण करणाऱ्या कलावंतांनी उपस्थित शिवप्रेमींची मने जिंकली.

छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळ्याजवळून निघालेली मिरवणूक हुतात्मा स्मारक चौक, आदर्श लॉज, लाईन आळी, लोकनेते दि. बा. पाटील प्राथमिक शाळा, गांवदेवी मंदिर, स्वा. सावरकर चौक, बापटवाडा चौक, महापालिका कार्यालय, सेवा योजन कार्यालय, बंदर रोड चौक, मौलाना आझाद चौक या मार्गाने निघून छत्रपती शिवाजी महाराज अर्धाकृती पुतळा टपाल नाका येथे या मिरवणुकीची सांगता झाली.

‘शिवराज्याभिषेक' सोहळ्याचे जिवंत सादरीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे, महापालिका उपायुक्त स्वरुप खारगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारली. शाहिर यशवंत जाधव यांच्या पहाडी आवाजातील पोवाड्यांनी आणि या नेत्रदीपक सादरीकरणाने उपस्थित शिवप्रेमी भारावून गेले होते.

याप्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त मंगेश चितळे, तसेच माजी सभागृह नेते परेश ठाकूर, महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, उपविभागीय अधिकारी पवन चांडक, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, माजी नगरसेवक अनिल भगत, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सिडको येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी