‘हिंद दी चादर' पूर्वतयारी म्हणून ‘आरम्भता की अरदास'
नवी मुंबई : ‘हिंद दी चादर' श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम शताब्दी वष्राानिमित्त येत्या २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ रोजी खारघर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून खारघर, सेवटर-२९ मधील ओव गांव मैदानावर ‘संत समाज'चे प्रधान संत ज्ञानी हरनाम सिंघजी (मुखी दमदमी टकसाल) यांच्या हस्ते ‘आरम्भता की अरदास' करण्यात आली.
अल्पसंख्याक विकास विभाग, राज्य समन्वय समिती आणि शीख, सिकलगर, बंजारा, लबाना, मोहयाल, सिंधी, वाल्मिकी, उदासीन तसेच भगत नामदेव (वारकरी) संप्रदाय अशा ९ विविध समाजांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रासह देशभरातून लाखो भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
संत ज्ञानी हरनाम सिंघजी यांनी हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या बलिदानाविषयीचे माहात्म्य सांगितले. पुढील पिढीपर्यंत श्री गुरु तेग बहादूर यांच्या शौर्याचा इतिहास पोहोचवणे, असा या कार्यक्रमाचा उद्देश असून शहादतविषयी जागर करणे का महत्वाचे आहे, याविषयी त्यांनी सविस्तर विवेचन दिले.
यावेळी कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, खारघर येथे श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या ३५० व्या शहीद जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य कार्यक्रमासाठी प्रशासनाने व्यापक नियोजन केले असून तयारी महिनाभरापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. रायगड आणि ठाणे जिल्हा प्रशासनाने २५ समित्यांची स्थापना करुन विविध जबाबदाऱ्या निश्चित केल्या असून भाविकांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.
गुरु नानक नामलेवा समिती, शीख समुदाय तसेच विविध समाजघटकांच्या सहकार्याने सदर कार्यक्रम भव्य आणि ऐतिहासिक स्वरूपात पार पडणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
९ फेब्रुवारी रोजी ‘आरम्भता की अरदास' प्रसंगी कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उपजिल्हाधिकारी रविंद्र राठोड, ‘सिडको'चे सह-व्यवस्थापकीय संचालक राजा दयानिधी, गणेश देशमुख, मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे, पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे, अपर आयुक्त फरोग मुकादम, उपायुक्त विजय म्हसाळ, पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, रश्मी नांदेडकर, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे, ‘हिंद दी चादर' कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, क्षेत्रिय आयोजन समिती, नवी मुंबईचे अध्यक्ष अमरपाल सिंघ रंधावा, सुप्रीम कॉन्सील, नवी मुंबई गुरुद्वाराचे अध्यक्ष जअसाल सिंग सिध्दूू, आदिंसह (वारकरी) संप्रदाय समाजातील प्रतिनिधी उपस्थित होते.