निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा' नोटीस
ठाणे : येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येणाऱ्या निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहिलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुध्द महापालिका प्रशासनाने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. गैरहजर अधिकारी कर्मचारी यांना ‘कारणे दाखवा' नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली असून नोटीस मिळाल्यानंतरही जे अधिकारी-कर्मचारी हजर होणार नाहीत, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही प्रस्तावित केली जाणार असल्याचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, निवडणूक प्रशिक्षणास अनुपस्थित राहणे, केवळ शिस्तभंग नसून निवडणूक कायद्याचा गंभीर भंग असल्याचेही आयुक्त राव यांनी नमूद केले.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय आणि कायद्यानुसार पार पाडण्यासाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. ठाणे महापालिकेच्या वतीने २७, २८ आणि २९ डिसेंबर रोजी राम गणेश गडकरी रंगायतन आणि डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे पहिले प्रशिक्षण दोन सत्रात आयोजित करण्यात आले होते. मात्र, पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणास काही अधिकारी-कर्मचारी गैरहजर राहिल्याचे निदर्शनास आले असून संबंधित कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात येत आहे. सदर नोटिसीला समाधानकारक उत्तर न दिल्यास संबंधितांविरुध्द पुढील कठोर कारवाई केली जाणार आहे.
दुसऱ्या प्रशिक्षण सत्रास सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोणतेही कारण न देता अनिवार्यपणे उपस्थित रहावे. प्रशिक्षणास पुन्हा गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुध्द निवडणूक कायदा आणि भारतीय दंड संहितेनुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यासह शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
‘निवडणूक आयोग'च्या मार्गदर्शक सूचनांनुसार नियुक्ती झाल्यानंतर प्रशिक्षणात सहभागी होणे प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याचे कर्तव्य असून, त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे लोकशाही प्रक्रियेच्या कामात अडथळा आणण्यासारखे आहे. त्यामुळे कोणतीही चालढकल किंवा निष्काळजीपणा अधिकारी कर्मचाऱ्यांनी करु नये, नोटीस मिळाल्यानंतर ठाणे महापालिकेतील पहिल्या मजल्यावर स्थापन करण्यात आलेल्या निवडणूक आस्थापना विभागाशी संपर्क साधावा. दुसऱ्या प्रशिक्षणाचा आदेश प्राप्त करुन घ्यावा, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.