नवीन जिल्हाध्यक्ष नियुक्तीचा निषेध
कल्याण ः कल्याण-डोंबिवली मध्ये काँग्रेस पक्षात मोठी खळबळ उडाली असून, गेल्या २५ वर्षांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत असलेल्या सचिन पोटे यांच्यासह अनेक निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. वरिष्ठ नेतृत्वाच्या निर्देशांचे पालन करत आम्ही राजीनामा दिले असले तरी जिल्हाध्यक्ष बदलताना पाळली जाणारी परंपरा मोडण्यात आली. यामुळेच असंतोष उफाळून आल्याचे सांगत सचिन पोटे समर्थकांनी काँग्रेस नेतृत्वावर संताप व्यक्त केला आहे. यामध्ये कल्याण जिल्हा उपाध्यक्ष लिओ मेक्कनरॉय, कल्याण पूर्व ब्लॉक अध्यक्ष शकील खान, कल्याण पश्चिम ब्लॉक अध्यक्ष प्रवीण साळवे, कल्याण पूर्व ब्लॉक अध्यक्ष मनिषा सरजीने, डोंबिवली पूर्व ब्लॉक अध्यक्ष संकेत लोके, काँग्रेस कार्यकर्ता हेमराज डेरे आदींसह इतर पदाधिक़ाऱ्यांचा समावेश आहे.
पारंपरिकरीत्या नवीन जिल्हाध्यक्ष पूर्वीच्या जिल्हाध्यक्षांना भेटून पदभार स्वीकारतात. मात्र, यावेळी तसे न करता जल्लोष करण्यात आल्याने ‘सचिन पोटे यांनी पक्ष सोडावा' असा संदेश देण्याचा हेतू होता का? असा सवाल पोटे समर्थकांनी उपस्थित केला आहे. नवीन जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या राजाभाऊ पातकर यांच्याबाबतही संताप व्यक्त करण्यात आला आहे. राजाभाऊ पातकर यांनी २०१४ साली काँग्रेस उमेदवार असलेल्या सचिन पोटे यांच्या विरोधात बंड करुन भाजपा मध्ये प्रवेश केला होता. त्यांनी १० वर्षे भाजपात राहून प्रचारही केला. ‘भाजपा'च्या सत्ताकाळात साधे वॉर्ड अध्यक्षपद न मिळालेल्या नेत्याला अचानक काँग्रेसमध्ये घेऊन जिल्हाध्यक्षपद देणे म्हणजे निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांचा अपमान असल्याचा आरोप राजीनामा दिलेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.
गेल्या अकरा वर्षांपासून भाजपाच्या सत्ता काळात काँग्रेस पक्षाची बाजू घट्ट राखणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देण्याऐवजी, पक्षासाठी ‘शून्य योगदान' असलेल्या व्यक्तीला जबाबदारी देणे अन्यायकारक असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. पक्ष ज्याप्रकारे भाजपातील नेत्यांना घेऊन मोठी पदे देत आहे, त्यामुळे ‘काँग्रेस भाजप होत चालली आहे का?' असा थेट सवालही नाराज काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून उपस्थित करण्यात आला आहे.
नाराज काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी त्यांचा संपूर्ण असंतोष एका पत्राद्वारे काँग्रेस नेते राहुल गांधी, ‘काँग्रेस'चे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्यापर्यंत पोहोचविला आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष नेमणुकीचा निर्णय मागे घेतला नाही तर सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली वेगळा मार्ग अवलंबण्याचा इशाराही नाराज काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पत्रात दिला आहे.