हजारो श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन अद्यापही बाकी!

नवी मुंबई : श्रीगणेशोत्सव संपून तीन महिने होत आले तरी नवी मुंबई महापालिका तर्फे भाविकांकडून गोळा करण्यात आलेल्या हजारो श्रीगणेशमूर्तींचे अद्याप विसर्जन केले नसल्याचा संतापजनक प्रकार सानपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश सोमाजी कचरे यांच्या जागरुकपणामुळे उघड झाला आहे. या श्रीगणेशमूर्ती पार्किंग वा इतर ठिकाणी धुळ खात पडून राहिल्या असून, हजारो श्रीगणेशमूर्तींचे अद्याप विसर्जन न होणे म्हणजे हिंदूंच्या धार्मिक भावनांचा स्पष्ट अवमान असल्याची भावना गणेशभक्तांमध्ये निर्माण झाली आहे. या संदर्भात ‘हिंदु जनजागृती समिती'चे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे लेखी निवेदन देत संबंधित अधिकारी आणि जबाबदारांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. समिती तर्फे दिलेले निवेदन महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी स्वीकारले आहे.

राज्यातील विविध महापालिकांच्या हद्दीतही कृत्रिम तलावात विसर्जीत केलेल्या श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन न झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्य शासनाने तातडीने हस्तक्षेप करुन हिंदूंच्या धर्मभावनांचा विचार करत, संकलित सर्व मूर्तींचे शास्त्रोक्त पुनर्विसर्जन करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी ‘हिंदु जनजागृती समिती'चे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट यांनी केली आहे.


नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशीच मुंबई महापालिकेकडून ठाणे जिल्ह्यातील डायघर भागातील डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ शेकडो ट्रकभर गणेशमूर्ती टाकण्यात आल्याचा प्रकार घडल्याचे समोर आले होते. त्यावेळी ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर १५० पेक्षा अधिक डंपर ताब्यात घ्ोण्यात आले होते. यापूर्वीही पुणे, ठाणे, सातारा आदी जिल्ह्यांमध्ये खाडी, नाले, खदानी आणि जुनी विहिरी अशा अयोग्य ठिकाणी मूर्ती टाकल्याच्या घटना घडल्या आहेत. या सर्व प्रकारांमुळे गणेशभक्तांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. हिंदूंच्या धर्मभावना दुखावल्या गेल्या आहेत, असे ‘हिंदु जनजागृती समिती'चे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट यांनी निवेदनात नमूद केले आहे.

‘श्रीगणेशमूर्तींचे शास्त्रोक्त विसर्जन न होता त्यांचा अपमान होणे, असह्य आहे. प्रशासनाने सदर प्रकरण गांभीर्याने घ्ोण्याची गरज आहे. पुढील काळात अशा घटना होऊ नयेत, यासाठी श्रीमूर्ती विसर्जनानंतर संकलित झालेल्या मूर्तींचे नियोजित पध्दतीने विधीवत विसर्जन करण्याची आवश्यकता आहे. तसेच शासनाने हिंदू संघटना, संत, धर्माचार्य यांच्या सल्ल्याने धर्मसंमत आणि धर्मश्रध्द जपणारे धोरण ठरवून त्यानुसार अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. सध्या ज्या महापालिकांकडे संकलित गणेशमूर्ती आहेत, त्यांचे तातडीने शुध्द पध्दतीने विसर्जन करण्यात यावे आणि हिंदूंच्या श्रध्देचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ‘हिंदु जनजागृती समिती'ची मागणी आहे. - सुनील घनवट, महाराष्ट्र राज्य संघटक - हिंदु जनजागृती समिती. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट लागू करण्यास विलंब!