विक्रमी उमेदवारी अर्ज; छाननी प्रक्रियेला विलंब

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५-२०२६ साठी अर्ज छाननी आणि वैध-अवैध उमेदवारी अर्ज जाहीर करण्याची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरु असल्याने उमेदवार, त्यांचे नातेवाईक, सूचक आणि अनुमोदक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे सध्या सुरु असलेल्या निवडणुकींमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून सर्वाधिक उमेदवारी अर्ज एकट्या अंबरनाथ नगरपालिकेत दाखल झाले आहेत. तसेच इतर अनेक तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे या प्रक्रियेला विलंब झाल्याची प्रतिक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी विजय शर्मा यांनी दिली आहे.

१८ नोव्हेंबर रोजी अंबरनाथ नगरपालिकेच्या एकूण २९ प्रभागांतील ५९ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या अर्जांची छाननी सुरु होती. यामुळे कोणता अर्ज वैध ठरणार आणि कोणता अर्ज अवैध ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अर्ज बाद होण्याची भिती अनेक इच्छुकांच्या मनात असल्याने नगरपालिकेच्या आवारात उमेदवार, त्यांचे कुटुंबीय, सूचक, अनुमोदक आणि विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नगरपालिका सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनाही मोठी कसरत करावी लागली. छाननी प्रक्रिया संथ असल्यामुळे अनेक नागरिकांनी निवडणूक यंत्रणा, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत छाननी पूर्ण होऊन यादी जाहीर होण्याची अपेक्षा होती. मात्र, अधिकृत यादी रात्री ९.५० वाजता घोषित करण्यात आली.

या संदर्भात माहिती देताना निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विजय शर्मा यांनी सांगितले की, अंबरनाथ नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण ४०० नामांकन अर्ज दाखल झाले आहेत, जी संख्या सध्या सुरु असलेल्या महाराष्ट्रातील नगरपालिका निवडणुकांमध्ये सर्वाधिक आहे. बऱ्याच उमेदवारांनी एकापेक्षा जास्त म्हणजे काही जणांनी ३-४ अर्ज भरले होते आणि या सर्व अर्जांची छाननी करणे आवश्यक होते. तसेच अर्ज भरताना अनेकांनी त्यांचे वकील सोबत आणले होते, ज्यामुळे प्रतिपक्षी उमेदवारांकडून आलेले आक्षेप, दोन्ही बाजूंच्या उमेदवारांचे म्हणणे आणि अडचणी ऐकून घेणे यात वेळ गेला. ऑफलाईन अर्जांची छाननी आणि ऑनलाईन प्रक्रियेत आलेल्या तांत्रिक अडचणींमुळेही या संपूर्ण प्रक्रियेस उशीर झाल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले.

नगराध्यक्ष पदासाठी एकूण १४ अर्ज प्राप्त झाले होते, त्यातील ३ अर्ज अवैध झाले असून ११ अर्ज वैध ठरले आहेत. तर नगरसेवक पदासाठी एकूण ४०० अर्ज प्राप्त झाले असून त्यातील ५४ अवैध असून ३४६ वैध घोषित करण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी दिली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल महापालिका अतिक्रमण विभागाच्या पथकासोबत खारघरमध्ये धक्काबुक्की