पनवेल महापालिका अतिक्रमण विभागाच्या पथकासोबत खारघरमध्ये धक्काबुक्की
पनवेल : खारघर मधील पापडीचा पाडा येथे बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या आठवडा बाजाराचे अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पनवेल महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकासोबत तेथील 7 ते 8 फेरीवाल्यांनी धक्काबुक्की करुन कारवाईत अडथळा निर्माण केल्याची घटना गत 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली. खारघर पोलिसांनी या प्रकरणी 7 ते 8 जणांविरोधात सरकारी कामात अडथळा आणुन धक्काबुक्की केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
खारघर येथील पापडीचा पाडा भागात बेकायदेशीरीत्या आठवडी बाजार भरवण्यात येत असल्याने पनवेल महापालिकेचे प्रभाग अधिकारी अरविंद पाटील हे गत मंगळवारी सायंकाळी त्यांच्या पथकासह पापडीचा पाडा येथील आठवडा बाजाराचे अतिक्रमण हटवण्यासाठी गेले होते. यावेळी अतिक्रमण विभागाकडुन येथील फेरीवाल्यांवर कारवाई सुरु असताना, आखिल इकबाल पटेल, सुफयान मुल्ला, समीर शेख, जावेद नारली व इतर 3 ते 4 अनोळखी व्यक्तींनी पनवेल महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकासोबत धक्काबुक्की करुन त्यांना कारवाई करण्यापासून रोखले. या प्रकारानंतर अरविंद पाटील यांनी अतिक्रमण विरोधी पथकातील कर्मचाऱयांसोबत धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा आणणाऱया विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार खारघर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.