आरक्षण सोडतीला मनसे, ‘महाविकास आघाडी'चा विरोध

नवीन पनवेल : पनवेल महापालिकेने १७ नोव्हेबर २०२५ ‘निवडणूक आयोग'च्या पत्रान्वये काही जागांसाठी पुन्हा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला मनसे आणि ‘महाविकास आघाडी'च्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शविला.

कार्यक्रम सुरु होताच मनसे आणि ‘महाविकास आघाडी'चे प्रतिनिधी व्यासपीठावर जाऊन आरक्षणातील सुरु असलेल्या घोळ आणि मनमानीविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध नोंदविला. दोन्ही पक्षांनी प्रशासनावर आरक्षण प्रक्रियेबाबत पारदर्शकतेचा अभाव, अचानक बदल आणी मतदारांना दिशाभूल करणारी कार्यपध्दती केल्याचा आरोप केला. नाट्यगृहातील या आंदोलनामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. नंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत आंदोलनकर्त्यांना खाली उतरण्याची विनंती केली. पक्षांनी प्रशासनाकडे आरक्षण प्रक्रिया नियमबध्द, पारदर्शक आणि निष्पक्ष रितीने पार पाडण्याची मागणी केली आहे.

महापालिका अधिकाऱ्यांनी आरक्षण सोडत ‘आयोग'च्या निर्देशानुसार झाल्याचे सांगितले असले तरी विरोधी पक्षांनी सदर मुद्दा येत्या निवडणुकीदरम्यान अधिक आक्रमकपणे मांडण्याची भूमिका घेतली आहे.

याप्रसंगी मनसे शहराध्यक्ष तथा प्रवक्ते योगेश चिले, शेतकरी कामगार पक्ष शहराध्यक्ष प्रकाश म्हात्रे, शिवसेना उबाठा महानगराध्यक्ष अवचित राऊत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, ‘राष्ट्रवादी'चे (शरदचंद्र पवार पक्ष) ननावरे आणि इतर कार्यकर्ते हजर होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ठाणे भविष्यातील पर्यावरणाभिमुख शहर - सिध्देश कदम