ठाणे भविष्यातील पर्यावरणाभिमुख शहर - सिध्देश कदम
ठाणे : शहरातील पर्यावरण संवर्धन, प्रदुषण नियंत्रण, एकल वापर प्लॅस्टिक वस्तू, याचबरोबर रहिवासी संकुलातील सांडपाण्याचा पुर्नवापर आदि बाबींसाठी ठाणे महापालिका प्रयत्नशील आहे. ठाणे स्वच्छ, हरित शहर आहेच; परंतु ठाणे महापालिका राबवित असलेल्या उपक्रमांमध्ये प्रत्येक नागरिकांनी १०० टक्के सहभाग दिला तर पुढच्या पिढीला आणखीन पर्यावरणभिमुख असे ठाणे शहर अनुभवयाला मिळेल, असे मत ‘महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ'चे अध्यक्ष सिध्देश कदम यांनी ठाणे येथे केले.
‘प्रदुषण नियंत्रण मंडळ'चे अध्यक्ष सिध्देश कदम यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे महापालिका येथे झालेल्या बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त-२ प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत रोडे, पर्यावरण विभागाच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभाग, मलनिःस्सारण विभाग, प्रदुषण नियंत्रण विभाग, पशुवैद्यकीय विभाग राबवित असलेल्या उपक्रमाचे सादरीकरण प्रशासनाकडून करण्यात आले.
ठाणे किंवा कोणत्याही शहरात होणारे प्रदुषण त्या शहरापुरतेच मय्राादित राहत नाही. तर त्याचा परिणाम संपूर्ण राज्याला, देशाला होत असतो. म्हणून प्रत्येकांनी आपापल्या घरातील प्रदुषण कसे नियंत्रणात राहील या संदर्भात प्रत्येक शहराने इतरांसोबत देवाण-घेवाण करणे खूप गरजेचे आहे. शहरात बांधकाम चालू असलेल्या इमारतींमुळे प्रदुषण होवू नये यासाठी रेडी मिक्स प्लांटला आच्छादन करणे, रेडी मिक्स वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांचे टायर धुणे अशा विविध बाबी संदर्भात ‘प्रदुषण नियंत्रण मंडळ'ने यापूर्वीच महापालिकेला निर्देश दिले असून त्याची अंमलबजावणी होत असून ती अधिक प्रभावीपणे होणे गरजेचे असल्याचे अध्यक्ष सिध्देश कदम यांनी नमूद केले.
शहरात येणाऱ्या मोठ्या वाहनांचे टायर शहराच्या प्रवेशद्वारावरच धुतले गेले तर त्या टायरमधून शहरात होणारे धुळीचे प्रमाण कमी होईल. त्या माध्यमातून रस्त्यावरची धूळ नियंत्रणात येईल. तसेच नागरिक देखील जास्तीत जास्त प्रमाणात सार्वजनिक वाहनांचा वापर कसा करतील, यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करण्यात यावा. धुळ प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी ‘प्रदुषण नियंत्रण मंडळ'ने निश्चित केलेली नवीन मार्गदर्शक तत्वे सर्व आरएमसी प्रकल्पांना ‘ठामपा'ने वितरीत करुन त्याचे तंतोतंत पालन करण्याबाबत आदेश निर्गमित करावे.
-सिध्देश कदम, अध्यक्ष-महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ.
एकल वापर प्लॅस्टिक संदर्भात ठाणे महापालिका करीत असलेल्या कार्यवाहीचा आढावा अध्यक्ष सिध्देश कदम यांनी यावेळी घेतला. एकल वापर प्लॅस्टिक संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे. शहरातील हॉटेल्स ज्या ठिकाणी पदार्थ देण्यासाठी प्लास्टिकचा वापर केला जात आहे, अशांसाठी ठाणे महापालिका स्वतःच्या स्तरावर कायदा करुन कडक कारवाई करु शकते. एकल वापर प्लास्टिकबाबत रॅपिड ड्राईव्ह घेण्यात यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. सिंगल युज प्लास्टिक बंदीसाठी ठाणे महापालिकेने स्वतंत्र कक्ष स्थापून वेळोवेळी सिंगल युज प्लास्टिक जप्त करावे. त्याबाबत उपविधीमध्ये सुधारणा कराव्यात व शैक्षणिक संस्थांना सोबत घेवून मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, असे ते म्हणाले.
दरम्यान, ‘ठामपा'ने मोठ्या उद्यानांमध्ये आधुनिक मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र स्थापित करावे, त्यामधून प्रक्रिया केलेले सांडपाणी तेथील वृक्ष लागवडीसाठी वापरावी. बांधकाम व्यावसायीकांना लो-कॉस्ट एअर सेन्सर उभारण्यास सक्ती करावी. तसेच कत्तलखानाच्या ठिकाणांवरुन निघणाऱ्या वेस्टचे व्यवस्थित नियोजन करावे. तसेच हवा प्रदुषण नियंत्रणाबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना अध्यक्ष सिध्देश कदम यांनी बैठकीत दिल्या.