पनवेल भागात घरफोडी करणाऱ्या दुक्कलीला पोलिसानी पकडले

पनवेल : पनवेल तालुका परिसरात सलग घरफोड्या करुन पोलिसांना डोकेदुखी ठरलेल्या दुक्कलीला अखेर पनवेल तालुका पोलिसानी पकडले आहे. यात एका अल्पवयीन मुलाचा सहभाग असल्याचे आढळून आले आहे. पनवेलच्या भिंगारवाडी येथील बिअर शॉपमध्ये झालेल्या चोरीच्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसानी या दोघाची धरपकड करुन त्यांच्याकडून ६५,३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या दोघानी पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेले तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

गत ७ नोव्हेंबर रोजी अज्ञात चोरट्यांनी पनवेलच्या भिंगारवाडी येथील बिअर शॉपमध्ये घरफोडी करुन त्यातील २१ हजाराची रोख रक्कम व बिअर कॅन्स लंपास केले होते. याबाबत पनवेल तालुका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनुरुद्ध गिजे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने गोपनीय माहितीबरोबरच सीसीटीव्हीद्वारे तांत्रिक तपास सुरु केला. या तपासात सुदाम भगवान वाघे (२६) आणि १४ वर्षीय अल्पवयीन मुलगा या दोघांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी या दोघांना ११ नोव्हेंबर रोजी पनवेल परिसरातून ताब्यात घेतले.

त्यानंतर तपासादरम्यान पोलिसांनी या दोघांकडून दोन मोबाईल, मोटरसायकल, गुन्ह्यातील कपडे, मोबाईल चार्जर आणि २९ हजार रुपयांची रोख रक्कम, असा एकूण ६५,३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला तपासात या दोघांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेले एकूण ३ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत अटक आरोपी सुदाम वाघे याच्यावर यापुर्वी खालापुर व रसायनी पोलिस ठाण्यात घरफोडीचे तीन गुन्हे नोंद असल्याचे उघड झाले आहे. या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीन मुलाला बालसंवर्धन गृहात दाखल करण्यात आले असून, अटक आरोपीवर बी.एन. एस. च्या विविध कलमांनुसार कारवाई सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

लग्नसोहळ्यात घुसून दागिने–रोख रक्कम चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश