अज्ञात हॅकरकडून जेएनपीटी कंटेनर टर्मिनल मधील संगणक प्रणाली हॅक 

नवी मुंबई : अज्ञात हॅकरने न्हावाशेवा येथील जेएनपीटी कंटेनर टर्मिनल मधील संगणक प्रणाली हॅक केल्याने सदरची यंत्रणा मागील चार दिवसापासून बंद पडली आहे. सदरची संगणक प्रणाली कुणी व कशामुळे हॅक केली? हे अद्याप समजू न शकल्याने संगणक तज्ञांकडून त्याचा तपास करण्यात येत आहे. या प्रकारामुळे जेएनपीटी कंटेनर टर्मीनलचे कामकाज ठफ्प पडल्याने येथील कंटनेर टर्मीनलचे कामकाज ऑफलाईन पद्धतीने सुरु ठेवण्याची वेळ जेएनपीटी प्रशासनावर आली आहे. न्हावाशेवा पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात हॅकर विरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.  

गत रविवारी २० फेब्रुवारी रोजी ९ वाजण्याच्या सुमारास जेएनपीटी कंटेनर टर्मीनल  मधील संगणक प्रणाली अचानक बंद पडल्याने कंपनीचे कामकाज पुर्णपणे ठप्प पडले. त्यामुळे कंपनीच्या अधिकाऱयांनी संगणक तज्ञांमार्फत आयटी विभागातील संगणक यंत्रणेची तपासणी केली असता, अज्ञात हॅकरने इंटरनेटच्या माध्यमातून जेएनपीटी कंटेनर टर्मीनल मधील संगणक प्रणाली हॅक केल्याचे व त्यामुळे जेएनपीटी कंटेनर टर्मीनलच्या आयटी विभागातील सर्व संगणक बंद पडल्याचे आढळुन आले. या प्रकारामुळे जेएनपीटीचे इम्पोर्ट व एक्सपोर्टचे सर्व कामकाज ठफ्प झाल्याने कंपनीच्या अधिकाऱयांनी संगणक तज्ञांना बोलावून कंपनीतील संगणक प्रणाली कोणत्या हॅकर्सने हॅक केली, याची तपासणी केली. मात्र त्याबाबत संगणक तज्ञांना कोणतीही उपयुक्त माहिती मिळू शकली नाही.  

त्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संगणक तज्ञांच्या मदतीने जेएनपीटी कंटेनर टर्मीनलमधील संगणक प्रणाली पुर्ववत सुरु करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना अद्यापपर्यंत यश आलेले नाही. त्यामुळे जेएनपीटी कंटेनर टर्मीनल प्रशासनावर टर्मीनलचे कामकाज ऑफलाईन पद्धतीने सुरु ठेवण्याची वेळ आली आहे. जेएनपीटी कंटेनर टर्मीनल मधील आयटी विभागातील संगणक प्रणालीवर जेएनपीटी कंटेनर टर्मीनल मधील महत्वाचे कामकाज चालत असल्याने अज्ञात हॅकरकडुन त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याने जेएनपीटीचे उपप्रबंधक सुहास कामटीकर यांनी अज्ञात हॅकर विरोधात न्हावाशेवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात हॅकर विरोधात आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एकाच वेळी 111 प्रभागात पथनाट्य सादरीकरणाच्या जागतिक विक्रमाची नमुंमपा मानकरी