सहायक पोलिस निरीक्षक सुभाष पुजारी दुसऱ्यांदा मास्टर मि.भारत श्री 2022 किताबाचे मानकरी
नवी मुंबई : इंडियन बॉडीबिल्डींग फेडरेशनच्या वतीने पॉंडेचरी (तामिळनाडू) या ठिकाणी दि.22 व 23 फेब्रुवारी राेजी घेण्यात आलेल्या मास्टर भारत श्री 2022 या शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये महामार्ग पाेलिस केंद्र पळस्पेचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी 80 किलो वरील गटामध्ये सुवर्णपदक पटकाविले आहे. पुजारी यांनी सलग दुसऱ्यांदा मास्टर भारत श्री चा किताब पटकाविला आहे. येत्या 15 ते 21 जुलै 2022 रोजी होणाऱ्या मि.एशिया 2022 या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी भारतीय संघातून पुजारी यांची निवड करण्यात आली आहे.
गत 12 फेबु्वारी रोजी महाराष्ट्र बॉडीबिल्डर्स असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या मास्टर महाराष्ट्र श्री 2022 या स्पर्धेमध्ये सुभाष पुजारी यांनी 80 किलोवरील गटामध्ये सुवर्ण पदक पटकावून मास्टर महाराष्ट्र श्री 2022 हा किताब दुसऱ्यांदा मिळविलेला होता. त्यानंतर पॉण्डेचरी येथे होणाऱ्या मास्टर मि. महाराष्ट्र भारत श्री 2022 यासाठी त्यांची महाराष्ट्र संघातून निवड झाली होती. या स्पर्धेत सुभाष पुजारी यांनी 80 किलो वरील गटामध्ये सुवर्णपदक मिळवत मास्टर भारत श्री चा किताब सलग दुसऱ्यांदा पटकावला आहे.
सुभाष पुजारी यांनी यापूर्वी ऑक्टोबर मध्ये ताश्कंद (उझबेकिस्तान) या ठिकाणी झालेल्या वर्ल्ड बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये ब्राँझ पदक मिळविले होते. सध्या ते मि.ऑलिम्पिया सुनीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वन अबाव्ह जिम नेरुळ व रिसेट जिम बांद्रा मुंबई या ठिकाणी सराव करीत आहेत.
या स्पर्धेसाठी त्यांना चेतन पाठारे वर्ल्ड बॉडीबिल्डिंग सेक्रेटरी तसेच विक्रम रोठे वर्ल्ड बॉडीबिल्डिंग असोसिएशनचे लिगल अँडव्हायझर,प्रशांत आपटे साऊथ एशिया बॉडीबिल्डिंग संघटनेचे सेक्रेटरी .हिरल शहा इंडियन बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या सेक्रेटरी यांचे सहकार्य लाभल्याचे सुभाष पुजारी यांनी सांगितले.