कोपरीतील हवा गुणवत्ता केंद्र कधी सुरू होणार ?
नवी मुंबई-: नवी मुंबई शहरात हवा प्रदूषणाच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता हवा प्रदूषण करणाऱ्या स्त्रोतांची अचूक माहिती मिळवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने सानपाडा, सीबीडी व,कोपरी येथील नाल्याजवळ सनियंत्रीत हवा गुणवत्ता केंद्रांची दोन महिन्यांपूर्वी निर्मिती केली आहे . यातील सानपाडा आणि सीबीडी येथील केंद्र सुरू झाले आहेत. मात्र सर्वात जास्त हवा प्रदूषण होणाऱ्या कोपरी भागातील केंद्र अजून सुरू केले नसल्याने हे केंद्र कधी सुरू होणार? असा सवाल नागरीक करत आहेत.
नवी मुंबई परिसरात आशिया खंडातील सर्वात मोठा ठाणे-बेलापूर हा औद्योगिक पट्टा मोडतो. येथील रासायनिक कंपन्यांमधून प्रक्रिया न करताच सांडपाणी नाल्यात सोडणे,रात्री रासायनिक वायूमिश्रित वायू हवेत सोडणे असे प्रकार सर्रासपणे केले जातात.त्यामुळे कोपरखैरणे, कोपरी,घणसोली,तुर्भे ऐरोली भागातील नागरिकांना अनेकदा उलटी होणे,पोटात मळमळणे, डोळे चुरचुरणे, श्वासनास त्रास होणे,अंगाला खाज सुटणे व इतर त्वचा विकार होणे असे प्रकार घडलेले आहेत.या घटना घडू नयेत प्रदूषणाचे नेमके कारण शोधून त्यात नेमके कोणते घटक असतात याचा शोध घेऊन ते होण्यावर प्रतिबंध घालण्यासाठी शहरात मनपाच्या वतीने तुर्भे क्षेपणभूमी, कोपरखैरणे, नेरुळ व ऐरोली येथे सनियंत्रित हवा गुणवत्ता केंद्रे कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. तर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने महापे येथील प्रयोगशाळा आणि नेरुळ सिवूड मध्ये सनियंत्रण हवा गुणवत्ता केंद्रे उभारण्यात आलेली होती.त्यात आणखीण भर घालत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने सीबीडी अग्निशमन दल ,कोपरी येथील नाल्याजवळ व सेन्सर उद्यान सानपाडा येथे दीड कोटी रु खर्च करून आणखी तीन केंद्राची उभारणी केली आहे. यातील सानपाडा आणि सीबीडी येथील हवा गुणवत्ता केंद्र सुरू करण्यात आले आहेत.मात्र रात्री सर्वाधीक वायु प्रदूषण होणाऱ्या कोपरी भागातील हवा गुणवत्ता जेंडर अजूनही सुरू केले नसल्याने येथील प्रदूषणाचा अचूक आकडा कसा मिळणाऱ असा सवाल आता विचारला जात आहे.