‘सिडको’तर्फे दुसऱ्या टप्प्यात ६८.४ हेक्टर कांदळवन क्षेत्राचे वन विभागाला हस्तांतरण

 

नवी मुंबई ः ‘सिडको’तपेÀ दुसऱ्या टप्प्यात पनवेल तालुक्यातील सिडको अधिकार क्षेत्रातील ६८.४ हेक्टर कांदळवन क्षेत्राचे हस्तांतरण वन विभागाच्या कांदळवन कक्षाला २१ फेब्रुवारी रोजी करण्यात आले. ‘सिडको’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्या हस्ते विभागीय वन अधिकारी, मुंबई कांदळवन संधारण घटक एम. आदर्श रेड्डी यांना सदर कांदळवन क्षेत्राचे हस्तांतरण करण्यात आले.

दरम्यान, या आधीच्या पहिल्या टप्प्यात ‘सिडको’ने आपल्या अधिकार क्षेत्रातील २८१.७७ हेक्टर कांदळवन क्षेत्राचे वन विभागाला हस्तातंरण केले आहे. कांदळवनांचे पर्यावरणाच्या दृष्टीने असलेले महत्त्व लक्षात घऊन, कांदळवनांचे राखीव वने म्हणून संरक्षण व्हावे, या उद्देशाने ‘सिडको’कडून कांदळवनांचे हस्तातंरण करण्यात आले आहे.

याप्रसंगी ‘सिडको’चे सह-व्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास शिंदे, मुख्य नियोजनकार (बांधकाम परवाना) रविकुमार, सतिशकुमार खडके, अपर जिल्हाधिकारी तथा मुख्य भूमी-भूमापन अधिकारी (भूसंपादन) आणि ‘सिडको’तील अन्य अधिकारी त्याचप्रमाणे कांदळवन कक्ष, मुंबई यांच्यातर्फे वनक्षेत्रपाल, नवी मुंबई डी. एस. कुकडे देखील उपस्थित होते.  मुंबई महानगर प्रदेशातील कांदळवनांचे संरक्षण आणि जतन व्हावे याकरिता संबंधित शासन संस्था आणि प्राधिकरणांकडून आपल्या अधिकार क्षेत्रातील कांदळवन क्षेत्रांचे हस्तांतरण वन विभागाच्या कांदळवन कक्षाकडे करण्यात येत आहे. ‘सिडको’तर्फे यापूर्वी पहिल्या टप्प्यात पनवेल तालुक्यातील कामोठे येथील १३४ हेक्टर, पनवेल येथील ३८ हेक्टर आणि कोल्हे-खार येथील १०९ हेक्टर अशा एकूण २८१.७७ हेक्टर कांदळवन क्षेत्राचे ऑगस्ट २०२१ मध्ये वन विभागाकडे हस्तांतरण करण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यात ‘सिडको’तर्फे पनवेल तालुक्यातील उलवे येथील २४.२० हेक्टर, वहाळ मधील ३.१५ हेक्टर, वाघिवलीतील ३९.९४ हेक्टर आणि सोनखार मधील ०.७५ हेक्टर अशा एकूण ६८.४ हेक्टर कांदळवन क्षेत्राचे हस्तातंरण वन विभागाला करण्यात आले. त्याचप्रमाणे ‘सिडको’ने कांदळवन कक्षाच्या सहाय्याने ३७० हेक्टरवर खारफुटीची लागवड केली आहे. याचबरोबर मॅन्ग्रोव्ह इंटरप्रिटेशन सेलदेखील ऐरोली येथे आहे.

जमिनीची धूप होण्यापासून वाचवण्यासह पुराचे पाणी आणि वादळाला अटकाव करण्यामध्ये कांदळवने महत्त्वाची भूमिका बजावतात. तसेच अनेक पशू-पक्षी आणि जलचरांचा कांदळवनांमध्ये अधिवास असतो. सदर बाब लक्षात घऊन कांदळवनांना पुरेसे वैधानिक संरक्षण प्राप्त व्हावे म्हणून कांदळवन क्षेत्र अधिसूचित करुन, ‘सिडको’कडून सदर कांदळवन क्षेत्राचा ताबा कांदळवन कक्षाला देण्यात आला.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मुख्याध्यापिका अर्चना खाडे चव्हाण सर्वोत्कृष्ट शाळा प्रमुख पुरस्काराने सन्मानित