भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शाहिरी मुजरा
नवी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सेक्टर 15 ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील सभागृहात 'शाहिरी मुजरा महामानवांना' या पोवाड्यांच्या विशेष कार्यक्रमाव्दारे शिवरायांना स्वरांजली अर्पण करण्यात आली.
लोकशाहीर अमरशेख यांची शाहिरी परंपरा जपणारे त्यांचे नातू शाहीर निशांत जैनू शेख आणि त्यांच्या सहका-यांनी कलात्मक अविष्कार साकारणारे जोशपूर्ण पोवाडे, लोकगीते सादर करीत महाराजांचा प्रेरक इतिहास जागविला तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह इतर महामानवांचे चरित्रगान केले. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर तसेच महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्याप्रमाणेच रसिकही मोठ्या संख्येने हा शिवस्वरोत्सव अनुभवण्यासाठी कोव्हीड नियमांचे पालन करीत उपस्थित होते.
रसिकांनाच गण मानून साकारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे रचित शाहिरी गणाने प्रारंभापासूनच एकाहून एक सरस पोवाडे, लोकगीतांनी हा स्वरोत्सव उंचावत गेला. शाहीर अमरशेख यांचा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना केलेला मानाचा मुजरा, शिवरायांचा पाळणा, शिवजन्मामुळे पावन झालेल्या शिवनेरी किल्ल्याची मनोभावना साकारणारे गीत, 'शूर आम्ही सरदार' तसेच 'म्यानातून उसळे तलवारीची पात' सारखी जोशपूर्ण शिवगीते, 'प्रभो शिवाजीराजा' ही मानवंदना, 'अफझलखानाचा पोवाडा' अशा अनेक पोवाडे, गीतांनी शाहीर निशांत शेख व त्यांच्या सहकारी गायकांनी शिवरायांचा काळ रसिकांच्या समोर उभा केला. शाहीर अमरशेखांच्या 'एके रात्री सह्याद्री हसला' या 'समाजवादी छत्रपती' पोवाड्याने कार्यक्रम वेगळ्याच उंचीवर गेला. लोकशाहीर वामनदादा कर्डक यांचे 'माऊलीची माया होता माझा भिमराया' हे भीमगीत तसेच 'माझी मैना गावाकडे राहिली' ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची छक्कड या गीतांनाही रसिकांची विशेष दाद मिळाली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये विविध विषयांवर तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने आयोजित करून हे स्मारक विचारांचा वेध घेणारे वैचारिक दालन व्हावे यादृष्टीने सातत्याने कार्यक्रम आयोजित केले जात असून त्यासोबतच विविध लोककलावंताना हक्काचा मंचही उपलब्ध करून दिला जात आहे. याच धर्तीवर छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित 'शाहिरी मुजरा महामानवांना' या पोवाड्यांच्या विशेष कार्यक्रमाच्या वैशिष्ट्यपूर्ण आयोजनाचेही नागरिकांकडून स्वागत करण्यात आले.