ऐरोलीमध्ये शिव कन्यांच्या व्याख्यानाने शिवप्रेमी मंत्रमुग्ध

नवी मुंबई : शिवकालातील घटना आणि आजच्या घडणाऱ्या घटनांवर प्रकाश टाकत तीनही शिवकन्यांनी आपल्या मधुर वक्तृत्वाने शिवप्रेमींना खिळवून ठेवून छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाचे महत्व पटवून दिले. तसेच या देवताच्या स्वराज्याची आजच्या घडीला किती गरज आहे, ते विविध उदाहरणे देऊन विषद केले. यामुळे उपस्थित शिवप्रेमी अंगावर काटे येणारे वक्तृत्व ऐकून जागेवरच खिळून बसले होते.

ऐरोली रेल्वे स्थानकाच्या पूर्व दिशेला रिक्षा चालक मालक सेना तर्फे  शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी शिव व्याख्यात्या मानसी साळुंखे, मयुरी हरड आणि सायली भोसले यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या तीनही शिवकन्यांना व्याख्यान देण्यासाठी आयोजकांकडून पाचारण करण्यात आले होते. या कार्यक्रमात या तिघीनीही आजच्या परिस्थितीवर व्याख्यान देत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील कार्यावाहीचे दाखले दिले. ऐरोली रिक्षा चालक मालक सेनेचे स्टँड प्रमुख दादा सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवजयंतीचे आयोजन केले होते. यावेळी माजी नगरसेवक मनोज हळदणकर, सामाजिक कार्यकर्ते अतुल आवारी पाटील आदी उपस्थित होते.

सर्वप्रथम दिघा, इलठन पाडा येथील रहिवासी असणाऱ्या अकरा वर्षीय चिमुरडी मानसी साळुंखे हिचे व्याख्यान झाले. तिने महिला अत्याचार, शेतकरी आत्महत्या, बेकारी, मुलांकडून मोबाईलचा घाणेरडा वापर,आई वडिलांचे आदर्शावत विविध उदाहरणे देत महाराजांच्या कार्याला उजाळा दिला.

त्यानंतर सायली भोसले यांचे धमाकेदार व्याख्यान झाले. तिनेही त्यावेळी महाराजांच्या सैन्यदलात मावळ्यांची रांग लागत असे. त्याठिकाणी कधीही मृत्यूला कवटाळावे लागत होते. ही  परिस्थिती आज आहे का? असा सवाल व्यक्त करून आज नमस्काराच्या जागा कमी झाल्यात पण महाराज हे असे ठिकाण आहे की, त्या ठिकाणी आपोआप माणसे नतमस्तक होतात. लॉकडाऊन काळात नागरिक व्याकुळ झाले. पण आग्र्याहुन सुटका करताना महाराजही व्याकुळ झाले होते. तेव्हा त्यांनी वाईट परिस्थितीतही आपली सुटका करून घेतली. तेव्हा ते जर त्यांनी आपली बुद्धी चालवली नसती तर...आज निष्ठा नाही, फक्त पैश्याचा खेळ चालला आहे. यावर टीका व्यक्त करत वेळेला महत्व द्या असे सांगितले.

शेवटी शिवकन्या मयुरी हरड यांचे व्याख्यान झाले. या तरुणीने ही आजच्या सुरू असलेल्या राजकीय घराणेशाहीवर टीकास्त्र सोडत महाराजांच्या काळात घराणेशाही होती का हो? असा प्रश्न उपस्थितांना केला. त्यानंतर आजच्या दिवशी जन्मोत्सव निमित्त तरुण पुढाकार घेतोय. पण खरोखरच महाराजांचा वारसा जपतोय का? असाही प्रतिप्रश्न विचारला. तसेच बाईत ताई दिसेल तोच खरा शिवपुत्र असेही शेवटी सांगितले.
 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

शिवजयंतीच्या निमित्ताने रूग्णवाहिका लोकार्पण सोहळा