अभ्यासाच्या चिंतेतून बारावीतील विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या 

नवी मुंबई : ऐरोली सेक्टर-8 मधील यश पॅराडाईज इमारतीत राहणाऱ्या दिया शेजाल दत्ता (17) या विद्यार्थीनीने बारावीत कमी मार्क मिळतील या चिंतेतुन राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या दियाने अशा पद्धतीने आपले जीवन संपविल्याने ती रहात असलेल्या परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

या घटनेतील मृत दिया दत्ता ही ऐरोली सेक्टर-8 मधील यश पॅरेडाईज इमारतीत आई-वडीलांसह राहत होती. तसेच ती ऐरोलीतील डीएव्ही पब्लिक स्कुलमध्ये इयत्ता 12वीत शिकत होती. दिया अभ्यासात खुप हुशर असल्याने तिला दहावीमध्ये 98 टक्के गुण मिळाले होते. बारावीत देखील चांगले गुण मिळतील या अपेक्षेने दियाने अभ्यास सुरु केला होता. मात्र लॉकडाऊनमुळे शाळा-कॉलेज बंद असल्यामुळे दिया देखील ऑनलाईन अभ्यास करत होती. मात्र ऑनलाईन अभ्यासात तिचा अभ्यास पुर्ण होत नसल्याने ती सतत अभ्यासाच्या चिंतेत असायची. नुकतेच दियाची महाविद्यालयात परीक्षा झाली होती. या परिक्षेत गणीत विषयात अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळतील अशी तिला भिती वाटत होती. त्यामुळे दिया तणावाखाली येऊन घरात गप्प गप्प राहत होती.  

याच तणावातून दियाने गत 5 जानेवारी रोजी तिची आई कामावर गेली असताना व वडिल बाजारात गेले असताना, घरात एकटीच असलेल्या दियाने सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास बेडरुममधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास वडील घरी आल्यानंतर त्यांना दिया गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आली. या घटनेची माहिती मिळताच रबाळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दियाचा मृतदेह ताब्यात घेतला. रात्री उशीरा तिच्यावर दिवा गाव येथील स्मशानभुमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. रबाळे पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेनंतर ऐरोली परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कोव्हीड नियमावलीचे पालन करून जुईनगर येथील हरिनाम सप्ताहात शून्य कचरा जनजागृती