बुद्ध आणि स्वामी विवेकानंद
स्वामी विवेकानंद बुद्ध तत्त्वाकडे आकर्षित होण्याचे कारण तर्कशुद्ध विचार असावे. तर्कशुद्धता हे बुद्धांच्या एकूण शिकवणीचे सार होते. विवेकानंद बुद्धांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे कौतुक करत. बुद्धांनी सांगितले होते की, केवळ मी सांगतोय किंवा कोणा पुस्तकात लिहिले आहे म्हणून विश्वास ठेवू नका, तर स्वतःच्या तर्काने आणि अनुभवाने ते पारखून घ्या. विवेकानंदांना बुद्धांचा हा अंधश्रद्धामुक्त मार्ग आधुनिक काळासाठी अत्यंत प्रेरक वाटत असे. स्वामी विवेकानंद मानत असत की, बुद्धांची शिकवण ही वेदांतापेक्षा वेगळी नव्हती, तर ती वेदांताचाच एक व्यावहारिक आणि करुणामय विस्तार होता. विवेकानंद यांच्या मते, शंकराचार्य यांनी बुद्धी किंवा ज्ञानावर भर दिला. बुद्धांनी हृदयावर (करुणेवर) भर दिला. बुद्धांनी दिलेला बहुजन हिताय, बहुजन सुखाय हा मंत्र विवेकानंदांनी आपल्या कार्याचा आधार मानला होता.
स्वामी विवेकानंद हे केवळ हिंदू धर्माचे विचारक, प्रचार आणि प्रसारक होते, अशी मांडणी हिंदुत्ववादी अभ्यासकांनी केल्याने स्वामी विवेकानंद यांचे बुद्ध यांच्याविषयी काय मत होते, विचार होते ही बाब प्रकर्षाने पुढे आले नाही. दत्तप्रसाद दाभोलकर यांनी स्वामी विवेकानंद यांचे अंधश्रद्धा आणि एकुणात हिंदू धर्मामधील अनिष्ट चालीरीती याबाबत काय विचार होते, याची सांगोपांग मांडणी त्यांच्या स्वामी विवेकानंद यांच्यावरील पुस्तकात केली आहे. हे पुस्तक वाचताना हिंदुत्ववादी विचारवंतांनी स्वामी विवेकानंद यांना किती सीमित करून टाकले याची पदोपदी किंवा पानोपानी प्रचिती येते. त्यामुळे समग्र विवेकानंद वाचल्याशिवाय ‘विवेकानंद' आपल्याला कळणार नाहीत.
बुद्ध यांच्या तत्वज्ञानाची उत्सुकता खरे तर विवेकानंद यांची शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेत चाळवली गेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण या परिषदेत भंते अनागरिक धम्मपाल यांचे बुद्ध धम्म यावर व्याख्यान झाले होते. ते भाषण स्वामी यांच्या कानावर आले असावे. त्यातून त्यांनी बुद्ध आणि त्याचा धम्म काय आहे. बुद्धाचे विचार काय आहेत, याचा अभ्यास केल्याचे नाकारता येत नाही. गौतम बुद्धांचे आणि त्यांच्या शिकवणुकीचे मोठे प्रशंसक स्वामी विवेकानंद होते. त्यांच्या मते, ‘बुद्ध हे जगातील सर्वात महान कर्मयोगी होते.' ‘बुद्धांनी कोणत्याही स्वर्गाच्या आमिषाने किंवा देवाच्या भीतीने कार्य केले नाही. त्यांनी केवळ मानवाचे दुःख दूर करण्यासाठी आपले आयुष्य वेचले.' असे विवेकानंद म्हणत, बुद्ध हे जगातील एकमेव असे महापुरुष आहेत, ज्यांनी कोणताही वैयक्तिक स्वार्थ न ठेवता केवळ लोककल्याणासाठी कार्य केले. बुद्धांनी जातिभेद नाकारून सर्वांना समतेची वागणूक दिली, ही गोष्ट विवेकानंदांना अत्यंत महत्त्वाची वाटत असे. बुद्धांची करुणा केवळ मानवापुरती मय्राादित नव्हती, तर ती प्राणीमात्रांवरही तितकीच होती. त्यामुळेच की काय पूर्वी विविध धार्मिक विधीमध्ये प्राणी बळी दिले जायचे, त्याला जगात सगळ्यात आधी विरोध बुद्ध यांनी केला. तेव्हा मांसाहार करणारे बुद्धांच्या शिकवणीनुसार शाकाहारी झाले. हे परिवर्तन केवळ बुद्धांच्या करुणामयी विचाराचे द्योतक आहे. बुद्ध हे हृदयाचे अत्यंत विशाल होते. त्यांनी उपेक्षितांना आणि गरिबांना आपल्या जवळ केले. असे स्वामी विवेकानंद बोलत असत.
स्वामी विवेकानंद बुद्ध तत्त्वाकडे आकर्षित होण्याचे कारण तर्कशुद्ध विचार असावे. तर्कशुद्ध हा बुद्धांच्या एकूण शिकवणीचा सार होता. विवेकानंद बुद्धांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे कौतुक करत. बुद्धांनी सांगितले होते की, केवळ मी सांगतोय किंवा कोणा पुस्तकात लिहिले आहे म्हणून विश्वास ठेवू नका, तर स्वतःच्या तर्काने आणि अनुभवाने ते पारखून घ्या. विवेकानंदांना बुद्धांचा हा अंधश्रद्धामुक्त मार्ग आधुनिक काळासाठी अत्यंत प्रेरक वाटत असे. स्वामी विवेकानंद मानत असत की, बुद्धांची शिकवण ही वेदांतापेक्षा वेगळी नव्हती, तर ती वेदांताचाच एक व्यावहारिक आणि करुणामय विस्तार होता. विवेकानंद यांच्या मते, ‘शंकराचार्य यांनी बुद्धी किंवा ज्ञानावर भर दिला. बुद्धांनी हृदयावर (करुणेवर) भर दिला.'
बुद्धांनी दिलेला ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय' हा मंत्र विवेकानंदांनी आपल्या कार्याचा आधार मानला होता. बुद्धांच्या त्यागाबद्दल बोलताना ते अनेकदा भावूक होत असत. ते बुद्धांना महामानव आणि परम कारुणिक या विशेषणांनी संबोधित करत.
विवेकानंदांच्या मते, बुद्ध हे केवळ एका धर्माचे संस्थापक नव्हते, तर ते संपूर्ण मानवजातीला मिळालेली एक महान शक्ती आणि प्रेरणेचा स्रोत होते. त्यामुळेच की काय, ‘तथागत गौतम बुद्धांएवढा बुद्धिमान, प्रगल्भ, परिपूर्ण माणूस जगाने आजवर पाहिलेला नाही. बुद्धांच्या सामर्थ्याचा एक थेंब माझ्याकडे असता, तरी खूप झाले असते! एवढा थोर तत्त्वचिंतक कोणीच आजवर बघितला नाही. असा शिक्षक यापूर्वी कधी होऊन गेला नाही. काय सामर्थ्य होते पाहा. जुलमी ब्राह्मणांच्या सत्तेसमोरही हा माणूस वाकला नाही. उभा राहिला. तेवत राहिला.' असे स्वामी विवेकानंद यांनी १९०० मध्ये तथागत गौतम बुद्धांविषयी कॅलिफोर्नियात बोलताना व्यक्त केलेले हे विचार बुद्धांची महती गाणारे आहेत. ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी बुद्ध जयंती निमित्ताने १ मे २०२६ रोजी लिहिलेल्या लेखात, भारताची जगभरातली खरी ओळख आजही ‘बुद्धांचा देश' हीच आहे. भलेही त्यांचे जन्मगाव असणारे लुंबिनी आता नेपाळमध्ये असेल, पण बुद्ध आपले आणि आपण सारे बुद्धांचे. असे म्हटले आहे. ‘बुद्धांचा देश' हीच भारताची अनेक शतके ओळख राहिलेली आहे. देशाचे पंतप्रधान आरएसएसच्या कार्यक्रमात अखंड हिंदुस्तानचा पुकारा करत असले तरी त्यांना परदेशात भाषण करताना बुद्धांचा उल्लेख करावाच लागतो. इतका हा धम्म जगभर पसरलेला आहे. किंबहुना बुद्धांचा अहिंसा, समता, मानवतेचा, करुणेचा विचार स्वीकारलेले अनेक देश जगाच्या पाठीवर आहेत.
‘बुद्धांशी तुलना होईल, असा एकही माणूस नंतर जन्मलाच नाही', असे आचार्य रजनीशांनी म्हटले आहे. ‘अन्य धर्मसंस्थापकांनी लोकांना कर्मकांडाची चाकोरी दिली. त्या चाकोरीने बांधून टाकले. तथागतांचा धम्म ही विचारांची चाकोरीबद्ध मांडणी नव्हती. चाकोरी तोडून मुक्त करणारा धर्म बुद्धांनी सांगितला. जगातला एक धर्म सांगा, एक धर्मसंस्थापक सांगा, की जो स्वतःची अशी स्वतःच चिरफाड करतो! चिकित्सेची तयारी दाखवतो!' असे डॉ. आ. ह. साळुंखे यांनी ‘सर्वात्तम भूमिपुत्र गोतम' या ग्रंथात म्हटले आहे.
‘भक्त' वाढत चाललेले असताना, विखार ही मातृभाषा होत असताना आणि ‘व्हाट्सॲप फॉरवर्ड' हेच ज्ञान झालेलं असताना बुद्धांचा हा दृष्टिकोन आणखी समकालीन महत्त्वाचा वाटू लागतो. माणूस बदलतो, यावर बुद्ध विश्वास ठेवतात. कोणीही मानव बुद्ध होऊ शकतो, याची हमी देतात. मात्र, स्वतःला शरण जा, हीच पूर्वअट सांगतात. असे संजय आवटे आपल्या लेखात पुढे म्हणतात. शिवाय, ज्याला बुद्ध समजला, त्याला ‘सो कॉल्ड सक्सेस'वरची गल्लाभरू पुस्तकं वाचण्याची काही गरज नाही. ‘अत्त दीप भव' म्हणणारे बुद्ध तुमच्या आत असलेला दिवा प्रकाशमान करत असतात. दिवा असतोच आत, पण काजळी एवढी चढते की, आपण आपल्यालाच अंधारकोठडीत ढकलून देतो. असेही त्यांनी सांगितले आहे. आणि तेही खरेच आहे. बुद्धाला खंडन-मंडनात हरवणे शवय झाले नसल्याने नंतर त्याला विष्णूचा अवतार करण्यात आले. पण हा विष्णूचा अवतार देव्हाऱ्यात मात्र विराजमान झालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. एका विशिष्ठ समाज समूहाने रचलेले हे कुंभांड आजही आपल्याला बुद्धाला जवळ करत नाकारणारेही आहे. हा संस्कृती अधिक्षेप नव्हे तर काय? असे असताना बुद्धाविषयी मनापासून सत्य मांडणाऱ्या स्वामी विवेकानंदांना आता संघाचे नव विद्वान कोणत्या पंवतीत बसवणार? त्यांना मावर्सवादीही म्हणता येणार नाही. परिवर्तनवादीही म्हणता येणार नाही, अशी हिंदुत्वाद्यांची काेंडी खुद्द स्वामी विवेकानंद यांनीच करून ठेवलेली आहे. खरे तर कोणत्याही महापुरुषाला, महान मानवाला एका विशिष्ट चौकटीत अडकवणे हा त्या महान माणसाचा अवमान असतो. तो त्याच्या अनुयायांकडून तर होतोच, शिवाय भवतांकडूनही होतोच. त्यामुळे स्वामी विवेकानंद समग्र वाचल्याशिवाय त्यांचे बुद्धा विषयीचे विचार कळणार नाही. किंबहुना स्वामी विवेकानंद यांना डबकं झालेला धर्म नको होता, याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही.
जगाचा इतिहास हा मनस्वी माणसांनी रचला आहे, असे म्हटले जाते ते चुकीचे नाही. पण या मनस्वी माणसांनी तर्कवादाचा आसरा घेत घेत समाज परिवर्तनाचा लढाही दिलेला आहे. संन्याशाची पोरं म्हणून वाळीत टाकलेल्या ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांनी अभंगाच्या रुपात जगाची रीत काय असते, हे मांडण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वर महाराज यांनी तर संस्कृतमधील गीता प्राकृतमध्ये आणून तत्कालीन समाजाविरोधात मोठे बंड केले होते. एकेकाळी संस्कृत ही एलिट वर्गाची मवतेदारी असताना याच भाषेतील गीता प्राकृतात आणून ज्ञानेश्वर माऊलीने सर्वसामान्यांवर अनंत उपकार केलेले आहेत. गीतेतला कर्म विपायक हे तत्व सोडल्यास वेगळ्या अंगाने जीवनाचे मोठे सार यात सामावलेले आहे. कर्मयोग, ज्ञानयोग असे विविध दर्शने यात आपल्याला पहावयास मिळतात. स्वामी विवेकानंद यांचा हिंदू धर्माचा गाढा अभ्यास होता. शिवाय अन्य धर्मात जे काही चांगले आहे, ते त्यांनी आनंदाने स्वीकारले होते. त्यामुळेच बुद्धाला त्यांच्या विचारचक्रात कायमच आदराचे स्थान मिळालेले आहे. अर्थात आपल्याकडच्या कुपमंडूक वृत्तीच्या विदवानांनी त्यांना एका धर्मात बंधिस्त केले ही बाब अलहिदा. व्हॉटसॲप युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी असणाऱ्या प्रत्येकाने जर स्वामी विवेकानंद यांचे समग्र साहित्य वाचल्यास त्यांच्या विचारांना नवी दिशा मिळेल. जगाकडे पूर्वग्रहदूषित दृष्टीने न पाहता, अधिक सकारात्मक पध्दतीने थोरांचे विचार समजतील. - विवेक कांबळे