अंबरनाथमधील साई विभाग नव्या पथदिव्यांनी उजळला
अंबरनाथः येथील पूर्व भागातील प्रभाग क्रमांक २० मधील साई कानसई सेक्शन परिसरातील नागरिकांची गेल्या अनेक दिवसांपासूनची पथदिव्यांची समस्या आता कायमची सुटली असल्याचे मनोगत शिवसेना नगरसेवक कुणाल भोईर यांनी व्यक्त केले आहे. नुकताच या कामाचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. या नवीन सुविधेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पालिकेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
साई विभागातील प्लॉट क्रमांक ४५५ (मोरे यांचे घर) ते क्रिस्टल प्लाझा आणि प्लॉट क्रमांक ३८१ ते ३८९ या पट्ट्यात हे नवीन पथदिवे बसवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वी पावसाळ्यात झाडांच्या फांद्या पडल्यामुळे किंवा उघड्या तारा तुटल्यामुळे या भागातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असे. या तांत्रिक अडचणीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आता संपूर्ण परिसरात भूमिगत केबल टाकून नवीन पोल उभे करण्यात आले आहेत. यामुळे आता पावसाळ्यातही पथदिवे विनाखंड सुरू राहणार असून नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागणार नाही.
या लोकार्पण सोहळ्याला परिसरातील मान्यवर आणि नागरिकांनी मोठी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी प्रा. गुणवंत भंगाळे, उद्योजक परेशभाई शहा, डॉ. गौतम जटाले, जय हिंद बँकेच्या संचालिका रूपा देसाई-जगताप, ॲड. हर्षद भोसले, नंदू दलाल, आर्कटिेवट महेश जगताप, मयूर विसारिया, विजय इंगळे यांच्यासह स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.