"अविघ्नेय" ठरले विजेते
ठाणे : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ठाणे विभागाचा ७१ व्या प्राथमिक नाट्य महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह, कामगार कल्याण भवन, विक्रोळी येथे संपन्न झाला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नाट्य अभिनेते व नाट्य दिग्दर्शक रामदास काळे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून मेट्रो मॉल कल्याणचे उपमहाव्यवस्थापक स्वप्निल सायगावकर, ज्येष्ठ नाट्य रंगकर्मी-समाजसेवक रवींद्र औटी, प्रभात मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश सरनोबत, नाट्यमहोत्सवाचे परीक्षक रामकृष्ण पार्टे , राजेश गायतोंडे, नीलम सकपाळ यांच्यासह मंडळाचे कल्याण आयुक्त भास्कर मोरडे, उपकल्याण आयुक्त नंदकुमार राठोड हे मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेत कामगार कल्याण केंद्र वागळे इस्टेटच्या अविघ्नेय या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला, तर कामगार कल्याण केंद्र खोपटच्या दि हिंदू लेडी या नाटकाने द्वितीय क्रमांक, कामगार कल्याण केंद्र कणकवलीच्या साठा उत्तरांची कहाणी या नाटकाने तृतीय क्रमांक पटकावला. कामगार कल्याण केंद्र पनवेलचे ओय लेले हे नाटक उत्तेजनार्थ प्रथम क्रमांकाने तर कामगार वसाहत पिंगळी कुडाळचे तुझ्यात जीव रंगला हे नाटक उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांकाने विजयी झाले. कामगार कल्याण केंद्र पनवेलच्या ओय लेले या नाटकाचे लेखक दीपेश सावंत यांना कामगार लेखक म्हणून गौरविण्यात आले. याचबरोबर अभिनय पुरुष, अभिनय महिला, दिग्दर्शन, नेपथ्य, पार्श्व संगीत, प्रकाश योजना या विभागातील बक्षीसेही मान्यवरांच्या शुभहस्ते वितरित करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत कनवाळू यांनी केले; तर गजेंद्र आहेर यांनी आभार मानले. ठाणे विभागाचे प्रभारी सहाय्यक कल्याण आयुक्त नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन करण्यात आले होते.