डोंबिवलीमध्ये विद्यार्थ्यांची सामुहिक देवदेशोपासना
कल्याण : डोंबिवली मधील हिंदू नववर्ष ‘स्वागतयात्रा'च्या कार्यक्रमांची सुरुवात गणेश मंदिर संस्थान डोंबिवली येथे शालेय विद्यार्थ्यांच्या देवदेशोपासना या कार्यक्रमाने झाली. डोंबिवली मधील ३७ शाळांमधील जवळपास २००० विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि शिक्षक वर्ग, परिसरातील नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते. सामूहिक वंदे मातरम् झाल्यावर श्री गणेशाला वंदन करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर प्राजक्ता श्रोत्री, सोनाली केळकर उपस्थित होत्या.
गौरी कुंटे यांनी मुलांचे स्वागत केले. मंदिराच्या अध्यक्षा अलका मुतालिक यांनी मुलांशी संवाद साधत प्रास्ताविक केले. त्यानंतर अमेय काटदरे यांनी ‘स्वागतयात्रा'च्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांची माहिती मुलांना सांगितली. अथर्वशीर्ष पठणाने उपासनेची सुरुवात झाली. विविध शंकराचार्य रचित स्तोत्र, राष्ट्रभक्तीपर गीतांचे पठण झाल्यावर ओमकार इंटरनॅशनल शाळेच्या दर्शना सामंत यांनी मुलांशी मानवी जीवन मूल्य या विषयावर ओघवत्या भाषेत संवाद साधला. यानंतर उपस्थित मुलांनी श्री गणेशाचा प्रसाद आणि खाऊ घेऊन कार्यक्रम स्थळाचा निरोप घेतला.