कोल्हापूरचा अजिंक्य रेडकर राज्यस्तरीय ‘नवी मुंबई महापौर श्री'
नवी मुंबई : राज्यभरातील शरीरसौष्ठवपटुंमध्ये अत्यंत लोकप्रिय असणाऱ्या ‘नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा' आणि ‘नमुंमपा क्षेत्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धा' विष्णुदास भावे नाटयगृहात अत्यंत जल्लोषात संपन्न झाल्या.
राज्यभरातील विविध जिल्हयातून आलेल्या विविध वजनी गटाच्या १२८ शरीरसौष्ठवपटुंमधून कोल्हापूरच्या अजिंक्य रेडकर यांनी सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करीत दीड लाख बक्षीस रक्कमेसह ‘नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठवपटू २०२५-२६' किताबासह मानाचा नवी मुंबई महापौर श्री चषक स्विकारला. सोलापूरच्या पंचाक्षरी लोणार यांनी ५० हजार पारितोषिक रक्कमेसह राज्यस्तरीय उपविजेतेपद पटकाविले.
‘नवी मुंबई महापालिका क्षेत्र श्री २०२५-२६' या महापालिका स्तरीय स्पर्धेत सहभागी ७१ स्पर्धकांमधून सर्वोत्कृष्ट शरीरसौष्ठवपटुचे नमुंमपा क्षेत्र श्री विजेतेपद ७० हजार पारितोषिक रक्कम आणि मानाच्या चषकासहीत नेरुळच्या निरंत पाटील यांनी पटकाविले. नेरुळच्या अक्षय पाटील यांनी नवी मुंबई महापालिका क्षेत्र श्री स्पर्धेचे उपविजेतेपद ३८ हजार रक्कमेसह संपादन केले.
राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत मोहम्मद जमाल, ठाणे यांनी ‘मोस्ट इम्प्रुव्हड बॉडी बिल्डर' किताब तसेच स्वप्नील सकपाळ, रायगड यांनी ‘बेस्ट पोझर' किताब पटकाविला. या दोघांनाही प्रत्येकी १५ हजार रुपये रक्कमेची पारितोषिके प्रशस्तीपत्रासह प्रदान करण्यात आली.
एकूण १९९ शरीरसौष्ठवपटुंच्या उत्साही सहभागातून यशस्वी झालेल्या या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचा शुभारंभ ‘नवी मुंबई'च्या महापौर सुजाता पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. नुकत्याच महापालिकेच्या निवडणुका झाल्याने ६ वर्ष कालावधीनंतर या स्पर्धा ‘नवी मुंबई महापौर श्री' या पूर्वीच्याच नावाने आयोजित करण्यात आल्या.
नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा ५५, ६०, ६५, ७०, ७५, ८०, ८५ किलोपर्यंत आणि ८५ किलोवरील अशा ८ वजनी गटांमध्ये आयोजीत करण्यात आली. तसेच नवी मुंबई महापालिका क्षेत्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धा ५०, ५५, ६०, ६५, ७० किलोपर्यंत आणि ७० किलोवरील अशा ६ वजनी गटांमध्ये आयोजित करण्यात आली होती. या प्रत्येक वजनी गटातील अनुक्रमे ६ आणि ५ विजेत्यांना रोख पारितोषिकांसह प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी उपमहापौर दशरथ भगत, माजी खासदार तथा ‘बॉडी बिल्डींग असोसिएशन'चे अध्यक्ष संजीव नाईक आणि इतर मान्यवर उपस्थित होते. तर स्पर्धा शुभारंभप्रसंगी महापौर सुजाता सुरज पाटील यांच्यासह क्रीडा विभागाच्या उपायुक्त अभिलाषा म्हात्रे-पाटील, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे, ‘महाराष्ट्र राज्य शरीरसौष्ठव संघटना'चे सेक्रेटरी राजेंद्र चव्हाण, उपाध्यक्ष गोपाळ गायकवाड, पदाधिकारी शरद मारणे, अजय गोळे, ‘नवी मुंबई शरीरसौष्ठव संघटना'चे अध्यक्ष जी. एस. पाटील, सेक्रेटरी हेमंत खेबडे, विनय मोरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.