‘एन्व्हायरोटेक एशिया परिषद'मध्ये ‘नमुंमपा'चे जल व्यवस्थापनावर प्रभावी सादरीकरण

नवी मुंबई : पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकास आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराला चालना देणारी ‘एन्व्हायरोटेक परिषद -२०२६' सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये संपन्न झाली. यामध्ये केंद्र आणि राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी, विविध महापालिका आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ, निरी तसेच औद्योगिक क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांचे प्रतिनिधी, संशोधक, सल्लागार आणि धोरणकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या ‘परिषद'मध्ये महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे आणि अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, नवी मुंबई महापालिका उप अभियंता स्वप्नील देसाई यांनी ‘प्रक्रियाकृत सांडपाणी भविष्यातील जलस्त्रोत' (Wastewater as a Future Water Source: Advancing Treatment Technologies & Tackling Emerging Contaminants) या विषयावर अभ्यासपूर्ण सादरीकरण केले.

भविष्यातील नियोजनाच्या दृष्टीने या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सखोल आणि माहितीपूर्ण सादरीकरणामध्ये उपअभियंता देसाई यांनी भविष्यातील वाढती पाणीटंचाई, जलस्त्रोतांवरील वाढता ताण आणि शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर सांडपाणी असे पर्यायी आणि शाश्वत जलस्त्रोेत म्हणून कसे विकसित करता येईल, याबाबत सविस्तर मांडणी केली. आधुनिक सांडपाणी उपचार तंत्रज्ञान, तृतीय आणि चतुर्थ स्तर उपचार  (Tertiary & Advanced Treatment), उदयास येणारे प्रदूषक (Emerging Contaminants) आणि त्यांचे संभाव्य धोके तसेच त्यावरील नियंत्रण आणि उपाय यावर त्यांनी विशेष भाष्य केले. यासोबतच महापालिकेच्या स्तरावर करता येणाऱ्या व्यावहारिक उपाययोजना आणि धोरणात्मक दृष्टिकोन यावरही त्यांनी प्रकाश टाकला.

सदर ‘परिषद'चे उद्‌घाटन उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अनबलगन यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी त्यांनी पर्यावरणपूरक औद्योगिक विकास, स्वच्छ तंत्रज्ञानाचा अवलंब आणि शासन-उद्योग-स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यातील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले.

अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘परिषद'मध्ये नवी मुंबई महापालिकेच्या जल व्यवस्थापनाविषयी सादरीकरणाचा बहुमान मिळणे गौरवशाली बाब आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाणे जिल्ह्यासाठी १७०० कोटींच्या आराखड्यास वाढीव निधी -मुख्यमंत्री